‘वडिलांच्या भूमिकेत किरण मानेचं हवेत..’; छोट्या सिंधुताई साकारणाऱ्या अनन्याने केली होती देवाकडे प्रार्थना


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे कायम सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी सीजन ४’ नंतर किरण माने आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवताना दिसत आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झालेल्या ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ या कार्यक्रमात किरण माने हे अभिमान साठे म्हणजेच सिंधुताईंचे वडील अण्णा यांची भूमिका निभावत आहेत. नेहमीप्रमाणे हि भूमिका साकारताना ते पूर्ण प्रामाणिकपणाने प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. जी तुफान व्हायरल होत आहे.

मालिकेत छोट्या सिंधुताईंची भूमिका बालकलाकार अनन्या टेकवडे साकारत आहे. मालिकेत तिची कास्टिंग झाल्यानंतर वडिलांच्या भूमिकेत आपल्याला किरण मानेचं हवेत असे तिला आधीपासून वाटत होत. तशी तिने देवाकडे प्रार्थना देखील केली होती आणि तिची प्रार्थना देवाने ऐकली. मालिकेच्या शूटिंग दरम्यान अनन्या आणि किरण माने यांचे नाते खरोखरचं बाप- लेकीसारखे झाले आहे. या गोष्टीचा दाखल देताना किरण माने यांनी हि पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘..लहान, निरागस लेकरू आपल्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत आसंल तर दुसरं काय पायजे भावांनो!!’

‘आठ- दहा महिन्यांपूर्वीची गोष्ट. ”सिंधुताई माझी माई” मालिकेची तयारी सुरू होती. या लहान चिमुरडीचं – अनन्याचं, ”चिंधी” म्हणजेच छोट्या सिंधुताईंसाठी कास्टिंग झालं होतं… मी त्यावेळी बिगबाॅस मध्ये होतो. मला याविषयी काहीच माहितीही नव्हती. त्यावेळी मला बिग बाॅसमध्ये पाहून माझी फॅन झालेलं हे लेकरू खेळण्याबरोबर खेळता- खेळता आईजवळ म्हणत होतं की, “मला माझ्या बाबांच्या रोलसाठी किरण माने पाहिजेत. मी देवाजवळ प्रेयर करणार आहे!!”

‘ … हे प्रोजेक्ट मी बिग बाॅसमध्ये असताना येणार होतं, ते काही कारणानं लांबलं आणि अनन्याची प्रेयर देवानं ऐकली. मी खरंच या प्रोजेक्टचा अविभाज्य भाग बनलो! आज अनन्या आणि माझं ”ऑन स्क्रीन बाॅन्डिंग” खरंच बापलेकीसारखं आहे. लै गोड हाय पोरगी. मी कायम अनन्याच्या आईबाबांना गंमतीनं म्हणतो, “माझं पोरगं लहान असतं तर हिला मी सून करून घेतली असती” लै गोड हाय छोटी सिंधुताई!!’