‘झुकेगा नहीं साला..’; अक्षयाच्या मंगळागौर कार्यक्रमात हार्दिकच्या उखाण्याने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातून प्रकाशझोतात आलेले अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे जोडपं सोशल मीडियावर कायम चर्चेत असतं. रील ते रिअल अशी यांची लव्हस्टोरी आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून राणा दा आणि पाठक बाई ही पात्र साकारत हार्दिक आणि अक्षयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. यानंतर त्यांचा साखरपुडा, लग्न सोहळा विशेष चर्चेत राहिला. दरम्यानचे फोटो तसेच व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. यानंतर नुकतीच अक्षयाची लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली. यावेळी हार्दिकने भन्नाट उखाणा घेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

हार्दिक जोशीने पत्नी अक्षया देवधरची पहिली मंगळागौर मोठ्या थाटामाटात साजरी केली. या सोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जय्यत तयारी, फुलांच्या माळा, विशेष पूजन. मंगळागौरीचे खेळ खेळत हा सोहळा दोघांनीही एन्जॉय केला.

यावेळी अक्षया आणि हार्दिकचा लुकदेखील फारच सुंदर आणि मॅचिंग असल्यामुळे चर्चेचा विषय ठरला. या मंगळागौरीच्या कार्यक्रमावेळी अक्षयाने नवऱ्यासाठी खास उखाणा घेतला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर आता हार्दिकने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यावेळी हार्दिकने लाडाच्या बायकोसाठी चक्क पुष्पा स्टाईल उखाणा घेतला. हार्दिक म्हणाला, ‘लग्नामध्ये घातली आम्ही एकमेकांना वरमाला, अक्षयाचं नाव घेतो झुकेगा नही साला’. हार्दिकचा उखाणा ऐकून सगळ्यांनी कडाडून टाळया वाजवल्या. सगळ्यांनी हार्दिकच्या उखाण्याचे आणि त्याच्या अंदाजाचे विशेष कौतुक देखील केले. त्याच्या या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.