‘भाड़याच्या घराला सोडून…’; ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्रीचा हक्काच्या घरात गृहप्रवेश


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्वसामान्य माणूस ते दिग्गज सेलिब्रिटी, राजकीय मंडळी वा इतर कोणत्याही उच्च पदस्थ माणसाचे स्वतःच्या हक्काचे घर असावे असे स्वप्न असतेच. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी सेलिब्रिटींनी या स्वप्नाची पूर्तता केल्याचे आपण पहिले आहे. प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, स्मिता शेवाळे, ऋतुजा बागवे आणि आता अभिनेत्रो कृतिका तुळसकरनेदेखील नवे आणि हक्काचे घर विकत घेतले आहे. याविषयी तिने स्वतःच सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

झी मराठीची गाजलेली मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधून शेवंता हे पात्र साकारलेली अभिनेत्री कृतिका तुळसकरने नुकतेच मुंबईत नवे आणि हक्काचे घर घेतले आहे. या नव्या वास्तूत गृहप्रवेश आणि गणेशपूजन झाल्यानंतर तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत कृतिकाने भाड्याचे घर ते हक्काचे घर घेतल्याची आनंदाची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कृतिकाने सोशल मिडीयावर हे फोटो शेअर करताना लिहिलेले कॅप्शन प्रचंड चर्चेत आहे.

कृतिकाने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘मुंबईत आल्यानंतर पेइंग गेस्ट ते भाड़याच घर ते स्वतःच घर यात खुप मोठा काळ होता. पुजेला बसल्यावर त्या सर्व प्रवासावर एक नजर फिरवली तेव्हा वाटलं, बरंच…. काही शिकवणारा होता हा प्रवास. आता नवीन घर नवीन जबाबदारी आणि खुप आनंद. भाड़याच्या घराला सोडून स्वतःच घर घ्यायचा निर्णय हा फक्त आणि फक्त आमच्या चिकू मुळे घेतलाय आम्ही .(ते का हे मि लवकर च एका वीडियो मधे सांगेन) पण जिच्या मुळे आम्ही स्वतःच घर घेऊ शकलो, तिच्या पावलांचे ठसे आमच्या दरवाजा वर आहेत. ती खरी मालकिन आहे या घराची असं आम्ही म्हणतो.’. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी आणि कलाकार मंडळींनी नव्या घरासाठी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.