‘एक मराठा लाख मराठा’; जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावरील प्राजक्ता गायकवाडची पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर विविध विषयांवर व्यक्त होत असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक असो किंवा अन्य कोणताही गंभीर विषय असो ही मंडळी आपापले मत प्रकट करताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर गेल्या शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असताना काही मराठी कलाकारांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेनंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी बंदची देखील पुकार ऐकू आली. या घटनेवर राजकारणी मंडळी, सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींसह मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी खुलेपणाने संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेदेखील भाष्य केलं आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारल्यानंतर प्राजक्ताचा चाहता वर्ग वाढला आहे. शिवाय ती कायम मराठा असल्याचा अभिमान बाळगताना दिसते. अभिनेत्री असूनही ती समाजातील अमान्य गोष्टींविरोधात परखडपणे बोलते. आताही तिने या लाठीचार्ज घटनेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमधील एक फोटो शेअर करत लिहिलंय, ‘रक्त उसळलंय… रक्त पेटलंय’. यासोबत तिने ‘९६ कुळी मराठा’, ‘अभिमान’, ‘एक मराठा लाख मराठा’ असे हॅशटॅग वापरले आहेत. तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.