‘स्वातंत्र्याचा पहिला हुंकार..’; गुरुपौर्णिमेला सुबोध भावेची राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाला भेट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे हा अतिशय गुणी कलाकार आहे. नाटक, मालिका, चित्रपट, सिरीज अशा विविध माध्यमातून सुबोध भावेने नेहमीच विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अतिशय हुशार, हरहुन्नरी आणि कष्टाळू अभिनेता म्हणून सुबोध भावेकडे पाहीले जाते. सुबोध भावेचा स्वतःचा असा एक मोठा चाहता वर्ग आहे जो त्याला सोशल मीडियावर फॉलो करत आहे. त्यामुळे सुबोधने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळताना पहायला मिळते. सुबोध भावेने आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानी अर्थात सिंदखेडराजाला भेट दिली. या ठिकाणच्या फोटोंसह त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता सुबोध भावे याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुबोधने जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजाला भेट दिली. या भेटीबाबत पोस्ट शेअर करताना त्याने माँ जिजाऊ जन्मस्थानाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना त्याने लिहिलंय, ‘आज गुरूपौर्णिमा, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी म्हणजे सिंदखेडराजा येथे त्यांचा जन्म झाला त्या वास्तूला भेट देण्याचा योग आला. स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे उमटला त्या पवित्र वास्तूच आणि आई जिजाऊं यांचे आशिर्वाद घेता आले. आई जिजाऊ आणि कळत- नकळत संस्कार करणार्‍या सर्व गुरूंना मनापासून वंदन आणि साष्टांग नमस्कार’.

सुबोधने शेअर केलेली हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुबोधचे चाहते आणि अनेक नेटकरी या पोस्टवर कमेंट करत ‘गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा’ देताना दिसत आहेत. शिवाय काही नेटकरी या स्थळापासून आसपास असणाऱ्या अन्य काही प्रसिद्ध स्थळांची माहिती देताना देखील दिसत आहेत. अभिनेता सुबोध भावेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच ‘फुलराणी’, ‘वाळवी’, ‘हर हर महादेव’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकांमध्ये दिसला होता. यातील ‘हर हर महादेव’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.