प्रवीण तरडेंनी कुटुंबासोबत अनुभवला सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम; म्हणाले, ‘शेवटी डोळ्यात पाणी आलंच..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ हा २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा वीर पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक, चाहते, समीक्षकी यांसह अनेक कलाकारदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. दरम्यान कुटुंबासोबत प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा हा चित्रपट पाहिला आणि यावेळी कलाकारांचे भरभरून कौतुक केले आहे.

प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याबरोबर पुन्हा एकदा पाहिला आहे. यानंतर चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले कि, ‘रुबाबदार ‘’सुभेदार’’… काल सहकुटुंब सहपरिवार सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम अनुभवला. तो सुध्दा लेखक- दिग्दर्शक, गीतकार दिग्पाल लांजेकर सोबत. मी आणि पिट्याने सिनेमा आधीच पाहिला होता, 1st day 1st show. तरी काल पुन्हा पहातानाही शेवटी डोळ्यात पाणी आलेच. तानाजी रावांची भुमिका काय जबरदस्त साकारलीये अजयने. त्याची देहबोली आणि संवादफेक थेट साडेतीनशे वर्ष मागे घेउन जाते. दिग्पाल, मित्रा तू खरंच इतिहास जगतोस म्हणुनच तू साकारलेला बहिर्जी खुप सहजसुंदर होता. सिनेमा पहाताना राजदत्त गुरूजी, मंदार परळीकर या शिवभक्तांचा अभिनय सुखावून जातो’.

‘मृणाल कुलकर्णी यांनी वयाचे तीन टप्पे साकारताना बदललेला आवाज आणि देहबोली जीजाऊंचा करारीपणा ठळकपणे उमटवतात. चिन्मय मांडलेकर हा त्याच्या खऱ्या आयुष्यात जितका खरा आणि सात्विक आहे तितकेच खरे आणि सात्विक महाराज तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो. समीर धर्माधिकारी तू साकारलेला शेलार मामा क्या बात है मित्रा, खुप दिवसांनी दिसलेली स्मिता शेवाळे भाव खावून गेली. बिपीन सुर्वे, मृण्मयी आणि आस्ताद अप्रतिम. निखिल लांजेकर आणि संगीतकार देवदत्त बाजी तुम्हाला १०० पैकी २०० गुण दिले पाहीजेत . शेवटच्या भैरवीसाठी निवडलेला तुकोबांचा अभंग अफलातून. अवधूत गांधीच्या आवाजाच्या तर मी प्रेमातच पडलोय. सुभेदारांचा पराक्रम सहकुटुंब नक्की बघा’.