‘मी घाण दिसतेय.. माझी दाढी मिशी दिसते.. ‘; आत्मविश्वास गमावल्याने अभिनेत्रीची ‘अशी’ झालेली अवस्था


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. उर्मिला हि अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर आहे. नुकतेच उर्मिलाच्या युट्यूब चॅनलने १ मिलियनचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त तिने एक व्हिडीओ शेअर करत एक अत्यंत भयावह अनुभव शेअर केला आहे. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर तिची काय अवस्था झाली होती याबाबत तिने या व्हिडिओत भाष्य केले आहे.

यामध्ये उर्मिला म्हणाली कि, ‘एके दिवशी मालिकेच्या सेटवर गेले तेव्हा कोणीही माझ्याकडे बघत नव्हतं. मेकअप आर्टिस्ट माझ्याकडे दुर्लक्ष करत होते. अशातच मला कळलं की मला मालिकेतून काढून टाकलं आहे. त्यामुळे मला सेटवर जाता येत नव्हतं. कलाकार थांबले होते. तितक्यात एक प्रोडक्शनमध्ये काम करणारी मुलगी मला येऊन म्हणाली की चॅनलने मला मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. जेव्हा मला मालिकेतुन काढण्यात आलं तेव्हा मला वाटलं की मी खूप फालतू आहे. अयशस्वी आहे. मूर्खासारखं सगळं सोडलं, सगळं दिलं. माझ्या आयुष्याची वाताहत झाली. पुढे प्रोडक्शन हाऊसने मला एके ठिकाणी नेलं आणि सांगितलं की तू सारखी आजारी आहेस आणि सही करून घेतली की तू स्वतःहुन मालिका सोडतेस’.

‘यानंतर मी खूप दुःखात गेले.. माझा आत्मविश्वास गेला.. मी घाण दिसतेय.. तुझी दाढी मिशी दिसते.. तुझा तीळ काढला तर सुंदर दिसशील.. अशा कमेंट यायच्या. 2016 मला हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मी सेटवर बेशुद्ध झाली.. मी त्या कागदपत्रांवर सही केली म्हणून त्यांचं नाव घेऊ शकत नाही. खूप गोष्टी गमावल्या. पैसे गेले.. खूप गोष्टी केल्या. दोष कोणाला दिला जातो. मी सोडली मालिका असं मी सगळ्यांना सांगितलं. पण कोणालाच माहीत नाही की मला काढलं गेलं. मी सेटवर माज करायची म्हणून मला काढलं अशा चर्चा सुरू झाल्या’. अशाप्रकारे उर्मिलाने तिच्या युट्यूब चॅनलवर ही संपूर्ण मुलाखत शेअर केली आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल पहिल्यांदाच उर्मिलाने उघड भाष्य केलं आहे.