हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज जगभरात कृष्णप्रेमी आणि भक्त गोकुळ अष्टमी साजरी करत आहेत. तर उद्या गोपाळकाल्याच्या निमित्ताने लहान मोठे गोपाळ उंचावरील हंडी फोडताना दिसतील. ठिकठिकाणी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विविध मंडळ, ट्रस्ट, राजकीय नेतेमंडळी मोठमोठ्या बक्षिसांच्या दही हंडी उभारतात आणि हे बालगोपाल श्रीकृष्णासारखे हंडी फोडतात. दरवर्षीप्रमाणे पुण्यात यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बनहव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या भव्य दहीहंडी महोत्सवाला मनोरंजन विश्वातील बरीच कलाकार मंडळी हजर राहणार आहेत. मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपला डंका वाजवणारे प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल, मराठी अभिनेते प्रविण तरडे, इन्फ्लूएंसर ईशान्य महेश्वरी, भारतीय क्रिकेटर केदार जाधव, डीजे तपेश्वरी, डिजे अखिल तालरेजा ही कलाकार मंडळी यंदाची दहीहंडी गाजवण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कोरोना महामारीचे संकट दूर होऊन सरकारने निर्बंधमुक्त उत्सव साजरे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या भव्य दहीहंडीची सुरुवात झाली.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्ट आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ यांनी एकत्र येत गतवर्षीपासून भव्य असा सार्वजनिक दहीहंडी महोत्सव साजरा करत आहेत. लक्ष्मी रस्त्यावर गुरुजी तालीम गणपती चौकात ही दहीहंडी कार्यक्रम होतो. गतवर्षी झालेल्या पहिल्याच वर्षी तब्बल ५० हजार तरुणांच्या उपस्थितीत ही दहीहंडी फोडली गेली होती. यावर्षी या मोहत्सवाचे दुसरे वर्ष आहे. गुरुवारी साय. ४ वाजता या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. जास्तीत जास्त युवा वर्गाने या दहिहंडी उत्सवासाठी उपस्थितीत राहावे असे आवाहन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी केले आहे.