‘पोलिसांनी मला खुर्चीवर बसलेल्या..’; ‘स्कॅम 2003’ सिरीजच्या निमित्ताने शशांकने केला मोठा खुलासा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही वेबसीरिज प्रचंड कॅचर्चेत आहे. नुकतीच २ सप्टेंबर २०२३ रोजी हि सिरीज सोनी लिव्ह या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली आहे. तर दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. या सीरिजमध्ये स्टँम्प पेपर घोटाळ्याचा मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीची भूमिका अभिनेते गगन देव रियार यांनी साकारली आहे. तर या सिरीजमध्ये मराठी अभिनेता शशांक केतकर देखील महत्वाच्या भूमिकेत दिसतो आहे.

‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर हा ‘स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी’ या वेबसीरिजमध्ये जयंत करमरकर हे पात्र साकारत आहे. या सिरीजमध्ये अब्दुल करीम तेलगीने स्टँम्प पेपर घोटाळा कसा केला हे दाखवण्यात आले आहे. सीरिजमध्ये नंदू माधव, भरत जाधव, समीर धर्माधिकारी, शशांक केतकर असे मराठी कलाकार आहेत. यानिमित्ताने शशांक केतकरने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्याने स्वतः अब्दुल करीम तेलगीला पाहिल्याचा खुलासा केला आहे.

‘मी एका शॉर्ट फिल्मसाठी पुण्यातील येरवडा तुरुंगात गेलो होतो. यावेळी तुरुंगातील एका पोलिसांनी मला खुर्चीवर बसलेल्या एका माणसाकडे बोट दाखवले आणि म्हणाले तो बसला आहे तो अब्दुल करीम तेलगी. त्याने स्टँम्प पेपरचा घोटाळा केला आहे. त्यावेळी पांढरे कपडे घालून खुर्चीवर बसलेला आणि ऊन खात पेपर वाचत बसलेल्या तेलगीची आठवण कायमस्वरुपी डोक्यात कोरली गेली. मी खऱ्या अब्दुलला बघितलं आहे आणि आज त्याच्याच जीवनावर आधारीत वेबसिरीजमध्ये काम करायला मिळाले आहे. एक सर्कल पूर्ण झाल्यासारखं मला वाटते’, असे शशांक केतकरने सांगितले.