ढोलकीच्या तालावर भार्गवी गणरायाला वंदन करणार; ‘लावण्यवती’तील पहिले गाणे उद्या प्रदर्शित होणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लावणीवर ठेका धरायला, त्यात धुंद व्हायला अनेकांना आवडतं. असाच लावणीचा खजिना घेऊन अवधूत गुप्ते संगीतप्रेमींच्या भेटीला येणार आहे. ‘लावण्यवती’ हा त्यांचा नवा अल्बम उद्यापासून रसिकांच्या भेटीला येत आहे. एकविरा म्युझिक तर्फे प्रदर्शित झालेल्या ‘लावण्यवती‘ या अल्बममधील पहिल्या गाण्याचा टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. घुंगरांचा नाद, ढोलकीचा ताल आणि नर्तिकांच्या नजाकतींमुळे या अल्बमविषयीची उत्सुकता प्रचंड वाढली होती. ‘लावण्यवती’तील पहिली लावण्यलतिका लावणीप्रेमींच्या भेटीला उद्या येणार आहे.

‘गणराया’ ही श्रीगणेशाला वंदन करणारी पहिली लावणी या अल्बममधून प्रदर्शित होणार आहे. ‘लावण्यवती’ या अल्बममधील पहिल्याच गाण्यात श्रीगणेशाला वंदन केले आहे. ‘गणराया’ या गणेश वंदनेत मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना भार्गवी चिरमुले आपल्या अदाकारीने भुरळ घालताना दिसणार आहे. या व्हिडिओचे नृत्य दिग्दर्शन सिद्धेश दळवी यांनी केले आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलेल्या ह्या गाण्याची शब्दरचनादेखील त्यांनीच केली आहे. तर प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी हे गाणे गायले आहे. अनुराग गोडबोले यांनी संगीत संयोजन केले आहे आणि गुरु पाटील यांनी संकलित केलेल्या या अल्बमची निर्मिती गिरिजा गुप्ते यांची आहे.

‘लावण्यवती’बद्दल अवधूत गुप्ते यांनी सांगितले कि, ‘लावणी नाही कापणी’ अशी या ‘लावण्यवती’ची टॅगलाईन आहे. तर अनेकांना हा प्रश्न आहे, याचा नेमका अर्थ काय? तर हा अल्बम पाहून, ऐकून याचा उलगडा होईल. चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी श्रीगणेशाने करायची असते. म्हणूनच या अल्बममधील पहिले पुष्प म्हणजेच ‘गणराया’ ही लावणी तुमच्या भेटीला आली आहे. हळूहळू बाकी पुष्पही तुमच्या भेटीला येतील. ‘लावण्यवती’ ह्या अल्बममध्ये वेगळ्या धाटणीची चार गाणी आहेत. प्रत्येक लावणीची एक खासियत आहे. आमचा हा नवीन प्रयत्न संगीतप्रेमी आणि नृत्यप्रेमींना नक्कीच भावेल’.