किशोरवयीन प्रेमाची गंमतीशीर कथा ‘आत्मपॅम्फ्लेट’; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वाळवी’च्या भव्य यशानंतर परेश मोकाशी पुन्हा एकदा एक नवीन लेखन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या आगामी कलाकृतीचे नाव ‘आत्मपॅम्फ्लेट’ असे आहे. ७३’व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचे नावदेखील अत्यंत वेगळे आहे. त्यामुळे ‘आत्मपॅम्फ्लेट’ म्हणजे काय..? या प्रश्नाचे उत्तर जर प्रेक्षकांना हवे असेल तर ६ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये जावंच लागेल. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित ‘आत्मपॅम्फ्लेट’चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत. त्यामुळे या चित्रपटाशी अनेक नामवंत नावे जोडली गेली आहेत.

दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, ‘चित्रपटाचे नाव असे का आहे, ते टिझरमध्ये स्पष्ट कळत आहे. खूप साधी, सरळ आणि मनाला भावणारी अशी ही कथा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोरोनाच्या काळात झाले होते. त्याचबरोबर इतर असंख्य आव्हानं असतानाही चित्रपटाच्या टीमने मनापासून काम केले आणि चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावली आहे. याचे सारे श्रेय संपूर्ण टीमचे आहे. ‘आत्मपॅम्फ्लेट’मधील पात्रांपैकी एखादे पात्र तरी बालपणी आपल्यात, आपल्या मित्र मैत्रिणीत दडल्याचे प्रेक्षकांना जाणवेल. एखाद्या फास्ट रोलर कोस्टर राईडसारखी, तिरकस विनोदी शैली चित्रपटाची आहे. सर्व वयोगटासाठी हा चित्रपट आहे’.