हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या मोठ्या मुलाची अर्थात अभिषेकची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात एखादा बिजनेस अर्थात व्यवसाय सुरु करताना दिसत आहेत. जसे कि, प्राजक्ता माळीने ‘प्राजक्तराज’ हा ज्वेलरी ब्रँड सुरु केला. तर महेश मांजरेकरांचा लेक सत्याने हॉटेल व्यवसायात एंट्री केली. याचप्रमाणे अभिनेता निरंजन कुलकर्णीनेसुद्धा स्वतःचा कॅफे सुरु केला आहे.
View this post on Instagram
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिषेकची भूमिका साकारणारा निरंजन आता हॉटेल व्यवसायात उतरला आहे. मालिकेतील त्याच्या पात्रावर प्रेक्षक जितकं प्रेम करतात तितकंच प्रेम त्याच्या हातच्या चवीला मिळेल, अशी अशा आहे. अभिषेकने नुकताच स्वतःचा कॅफे सुरु केला असून याबाबत त्याने स्वतःच माहिती दिली आहे. सोशल मीडियावर त्याने एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तो स्वतः कॅफेत चहा बनवताना दिसतोय. नुसता बनवताना नव्हे तर हा गरमागरम चहा तो ग्राहकांसाठी घेऊन जाताना देखील दिसतो आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
माहितीनुसार, अभिनेता निरंजन कुलकर्णीने ठाण्यात घोडबंदर, आनंद नगर परिसरात ‘बडिज् सॅंडविच’ नावाने हा कॅफे सुरु केला आहे. त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना कॅफेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘रिमझिम पाऊस आणि माझ्या हातचा चहा.. कधी येताय प्यायला?’ या कॅफेमध्ये अभिनेत्याला चहा बनवताना पाहून चाहत्यांनाही एक रिफ्रेश फिलिंग आलं असेल यात काही शंकाच नाही. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिवाय या व्हिडिओवर त्याचे चाहते आणि नेटकरी या नव्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देत आहेत.