‘शोधायला 1 वर्ष, बांधायला 6 महिने अन..’; प्रसाद खांडेकरने केला नव्या घरी गृहप्रवेश


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. यांपैकी एन म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर. विनोदी शैली आणि विनोदाच्या परफेक्ट टायमिंगची पकड असणारा प्रसाद घराघरात लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षात प्रसाद खांडेकरचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने वाढला आहे. दरम्यान प्रसादने नुकतंच नवं घर घेतलं असून त्याची एक झलक सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसह शेअर करत स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त केला आहे.

प्रसाद खांडेकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून वास्तुशांती पूजेचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘नवीन घर… अजून एक स्वप्न पूर्ण… घर शोधायला लागले १ वर्ष, घर बांधायला गेले ६ महिने, घर सजवायला गेले २ महिने, फायनली नवीन घरात शिफ्ट झालो. जुन्या दोन्ही घरांनी भरभरून दिलं… त्या दोन्ही वास्तूंचे आभार, मोरया!!!’ या फोटोंमध्ये प्रसादच्या घराची नेमप्लेट दिसते आहे. जी अत्यंत लक्षवेधी आहे. कलासृष्टीशी संबंधित असलेल्या या नेमप्लेटवर अनेक चित्रं रेखाटलेली आहेत. यात व्हिडीओ कॅमेरा, पेन, कलेची दोन रुपं दिसत आहेत.

प्रसादने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. प्रसादने त्याच्या कुटुंबासोबत आणि हास्यजत्रेतील कलाकारांच्या उपस्थित नव्या घरात गृहप्रवेश केला. यावेळी MHJ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता गौरव मोरे प्रसादच्या आनंदात सामील होताना दिसले. प्रसादच्या घराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर प्रसाद खांडेकरांच्या चाहत्यांनी तसेच अन्य नेटकरी आणि कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या घरासाठी अभिनेत्याचे अभिनंदन केले आहे.