हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यासारखे दर्जेदार चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते नागराज मंजुळेंसोबत काम करायचं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांमध्ये एक गोष्ट असते जी कळत नकळत समाजातील महत्वपूर्ण विषयांना हात घालते आणि थेट मनाला भिडते. त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती हि प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते. नागराज मंजुळेंचे सिनेमे मनोरंजनासोबत प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करतात आणि म्हणून प्रत्येक कलाकाराला त्यांच्यासोबत काम करायची इच्छा असते.
आकाश ठोसर, रिंकु राजगुरु ते बॉलीवुडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनीदेखील नागराज मंजुळेंसोबत काम केले आहे. यानंतर आता नागराज मंजुळेंच्या सिनेमात काम करण्यासाठी नवोदीत कलाकारांना संधी दिली जात आहे. होय. नागराज मंजुळेंचा आगामी ‘खाशाबा’ हा चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटासाठी नागराज मंजुळेंची जोरदार तयारी सुरु असून या सिनेमात नवोदीत कलाकारांना काम करण्याची नामी संधी मिळणार आहे. नागराज यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करुन ईच्छुक कलाकारांना ऑडीशन देण्याचे आवाहन केले आहे.
या पोस्टमध्ये नागराज मंजुळेंनी लिहिले आहे की, ‘जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित ”खाशाबा”. चित्रपट ऑडिशन. दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे.. फक्त मुलांसाठी.. वयोगट – ७ ते २५ वर्षे.. मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक. पाच फोटो (त्यातील ३ फोटो शरीरयष्टी दाखवणारे).. ३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ… ३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ… फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै..’ या चित्रपटात नागराज मंजुळे हे कुस्तीत देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांचे व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत.