हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रसाद ओक हा अष्टपैलु कलाकार आहे. विविध माध्यमातून त्याने कायम हे सिद्ध केलं आहे. मनोरंजन विश्वात आपल्या कलागुणांच्या जोरावर त्याने घट्ट पाय रोवले आहेत. नाटक, मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ आणि अभिनित ‘धर्मवीर’ हे चित्रपट त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले. यानंतर त्याचा चाहतावर्ग देखील वाढला. अलीकडेच प्रसादने एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली आणि यामध्ये त्याने मराठी प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.
या मुलाखतीत प्रसादला चित्रपटांच्या प्रेक्षकांबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी त्याने मराठी प्रेक्षकांबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधताना म्हटले कि, ‘नमस्कार रसिक प्रेक्षक, माझ्या मनातील बोलायची संधी मला मिळाली आणि त्या संधीचा पुरेपुर फायदा उठवण्याचा मी प्रयत्न करतोय. मला असं वाटतंय की तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली या सर्व भाषांमधील जे प्रेक्षक ते आधी त्यांच्या भाषेतील चित्रपटांवर प्रेम करतात. त्यानंतर इतर भाषेतील चित्रपटांवर प्रेम करतात. कधीही चेन्नई, हैदराबाद किंवा अशा ठिकाणी त्यांचे तमिळ आणि तेलुगू हे चित्रपट लागले असतील तर प्रेक्षक ते सोडून हिंदी आणि मराठी चित्रपट पाहायला गेले आहेत, असं कधीही घडत नाही. मला असं वाटतं की हे सर्व आपल्याकडे का घडत नाही..?’
‘आपल्या एका कुटुंबाचं चित्रपट बघण्याचं महिन्याचं बजेट जर ५०० रुपये असेल तर त्यातील पहिले २०० रुपये किंवा ३०० रुपये मराठी चित्रपट पाहण्यासाठी खर्च करावेत, असा विचार का केला जात नाही..? जर तुम्हाला वाटत असेल की तेवढा सकस मराठी चित्रपट कुठे आहे, तर मला वाटतं की हे चुकीचं आहे. सध्या मराठीतील प्रत्येक उत्तम दिग्दर्शक हा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विविधतेचे भांडार आहे. पण तुमची कमी आहे. तुम्ही आम्हाला जितके प्रोत्साहन द्याल, तेवढे जास्तीत जास्त चांगले चित्रपट आम्ही करु. तुम्ही जर आलात तर निर्माते जगतील, निर्माते जगले तर दिग्दर्शक जगतील आणि दिग्दर्शक जगले तर तुमच्यासमोर विविध कलाकृती आणू शकतील. ते या परभाषिकांकडून आपण शिकायला हवं. आधी मराठी चित्रपटांवर प्रेम करायला हवं. त्यानंतर मग इतर भाषांमधील चित्रपट पाहायला हवे’.