‘अमृतकला’ घेऊन आलंय नृत्याने नटलेलं बाप्पासाठीचं गाणं; ‘गणराज गजानन’ची पहिली झलक समोर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृता जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच मनमोहक अदाकारा आहे. अमृताने कायम तिच्या सौंदर्य, अभिनयासह नृत्य शैलीतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अमृतकला स्टुडिओच्या माध्यमातून ती कायम अविष्कारी नृत्यछटा सादर करत असते. अमृताचे असेच साधनेतून साकारलेले नृत्य आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या अत्यंत श्रवणीय आवाजातील सुरेल गीत आपल्या भेटीस येत आहे.

अमृत कला स्टुडिओच्या माध्यमातून अमृता खानविलकर आणि राहुल देशपांडे हे श्री गणराया चरणी एक सुंदर गीतपुष्प अर्पण करणार आहेत. या गाण्याचे नाव ‘गणराज गजानन’ असे आहे. या गाण्याची एक झलक अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. सोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ह्या गणेश चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन जाऊयात आणि त्याचं स्वागत जल्लोषात करूया.. राहुल देशपांडे ह्यांच्या सुराने आणि अमृता खानविलकरच्या नृत्याने नटलेलं बाप्पासाठीचं गाणं “गणराज गजानन” ह्याची ही झलक खास तुमच्यासाठी.. पूर्ण गाणं येतंय १२ सप्टेंबर २०२३’

अमृता खानविलकर आणि राहुल देशपांडे यांचं ‘गणराज गजानन’ गाणं येत्या १२ सप्टेंबर २०२३ रोजी म्हणजेच उद्या मंगळवारी प्रदर्शित होणार आहे. या गाण्याची पहिली झलक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. ‘बाप्पाची मूर्ती जशी हळू हळू आकार घेते त्याच प्रमाणे अतिशय श्रद्धेने हि कलाकृती लवकरच तुमच्या समोर घेऊन येतोय “गणराज गजानन”…. हे गाणं लवकरच तुमच्या भेटीला.. बोला गणपती बाप्पा मोरया!!’ असे म्हणत अमृताने या नव्या गाण्याबद्दल आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. हे गाणे उद्या प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांनादेखील या गाण्याबद्दल उत्सुकता आहे.