‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीची महत्वाच्या भूमिकेत एंट्री


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली हे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचे कथानक आणि मालिकेत येणारे नवनवे ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांमध्ये हि मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. आईपासून दुरावलेली सायली अनाथ आश्रमात मोठी होते. पण सायली खरी तन्वी असल्याचे सत्य हे केवळ तिची आई प्रतिमाला माहित आहे आणि आता तिची मालिकेत एंट्री होणार आहे. मालिकेत प्रतिमाची भूमिका ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्री शिल्पा नवलकर साकारताना दिसणार आहेत.

अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर BTS व्हिडीओ शेअर केला आहे. प्रतिमाच्या भूमिकेसाठी लागणाऱ्या खास मेकअपचा हा व्हिडीओ आहे. अपघातात प्रतिमा भाजलेली असल्यामुळे तिचा लूकदेखील तसा दाखवण्यात आला आहे. ज्यासाठी शिल्पा यांना खास प्रोस्थेटिक मेकअप करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शिल्पा यांनी लिहिलंय कि, ‘काही क्षणांसाठी दिसणाऱ्या भाजल्याच्या खुणा दाखवण्यास मागे असणारी मेहनत!! ‘‘ठरलं तर मग’’ मालिका स्टार प्रवाहवर पाहात राहा’.

अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी शेअर केलेला हा BTS व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. या व्हिडिओवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट करत लिहिलंय, ‘बापरे! तुला खरंच सलाम आहे’. दरम्यान ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये सध्या किल्लेदार प्रतिमाचा शोध घेताना दाखवले आहेत. मग आता प्रतिमा किल्लेदारांसमोर येणार का..? तसेच सायली आणि प्रतिमाची भेट होईल का.. ? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या भागात मिळतील.