‘रावण कॉलिंग’मध्ये मोठी स्टारकास्ट; फर्स्ट क्लॅप देऊन अमित ठाकरेंनी केला शूटिंगचा श्रीगणेशा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित ‘रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलीकडेच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला आणि त्यानंतर शूटिंगला दणक्यात सुरुवात झाली आहे. संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केले आहे. तर या चित्रपटाची सहायक पटकथा आणि संवाद सचिन दरेकर यांचे आहेत.

‘रावण कॉलिंग’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘रावण कॅालिंग’मध्ये सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, गौरव घाटणेकर, रवी काळे, बिपीन नाडकर्णी राजू शिसाटकर आणि सोनाली कुलकर्णी, मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या तरी हा चित्रपट कशावर आधारित आहे, याबाबत गोपनीयता असली तरी लवकरच या गोष्टी उलगडतील.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक संदीप बंकेश्वर म्हणाले कि, ‘चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की, ”रावण कॉलिंग”च्या निमित्ताने मी अनेक नामवंत कलाकारांशी जोडलो गेलो आहे. या सगळ्याच कलाकारांची अभिनयाची एक विशिष्ट शैली आहे. त्यांच्यासोबत काम करताना मजा येणार हे नक्की. अभिषेकही कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय आहे. त्याच्या वडिलांचे आज बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहे. परंतु कामाच्या बाबतीत त्यांचे नाते दिग्दर्शक – कलाकाराचेच आहे’.