‘वेळ रोज, अन स्थळ..’; मुंबईतील ट्रॅफिक जॅमच्या समस्येवर बोलताना अभिनेत्याचा पालिकेला टोला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई धावत शहर आहे. पण इथे धावताना किमान १०० वेळा ब्रेक लावावा लागतो. कारण मुंबईत वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. सध्या मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोची आणि रस्त्यांची काम सुरु असल्यामुळे आणखीच ट्रॅफिक जॅम होताना दिसत आहे. याचा त्रास सामान्य माणसांप्रमाणेच कलाविश्वातील अनेकांना होत आहे. याबाबत नुकतीच प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होत आहे.

हेमंत ढोमेने नुकताच मुंबईतील वाहतूक कोंडीचा एक फोटो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अनेक कलाकार नियमित स्वरूपात मुंबई- पुणे प्रवास करतात. तसेच मालिका आणि चित्रपटांचे सेट गोरेगाव फिल्मसिटीत असल्यामुळे कलाकारांची कायम या भागात ये जा असते.क अशावेळी वाहतूक कोंडीमध्ये त्यांचे तासंतास वाया जातात. ज्यामुळे अनेकदा प्रोजेक्ट पूर्ण करणे अवघड होते. हेमंत ढोमेपूर्वी सोनाली कुलकर्णी, सागर तळशीकर, अभिजीत खांडकेकर, गौतमी देशपांडे या कलाकारांनादेखील असा वाहतूक कोंडीचा अनुभव आला आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. सिनेक्षेत्रातील विविध अडचणींसह तो सामाजिक आणि राजकिय परिस्थितीवरदेखील खुलेपणाने भाष्य करतो. दरम्यान वाहतूक कोंडीचा अनुभव शेअर करताना त्याने पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने इंस्टाग्राम मुंबईतील वाहतूक कोंडीचा फोटो शेअर करत लिहिले कि, ‘मुंबई महानगरपालिका सादर करत आहे…ट्राफिक! वेळ रोज अन् स्थळ सर्वत्र!’