गणेशोत्सवाविषयी बोलताना मिलिंद गवळी म्हणाले, ‘दारु पिणं, मंडपात पत्ते खेळणं…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका ‘आई कुठे काय करते’मधून नाकारात्म पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मिडीयावर कायम सक्रिय असतात. विविध विषयांवर ते आपले मत मांडताना दिसतात. शिवाय कारकिर्दीतील अनुभव, किस्सेदेखील ते आवर्जून शेअर करतात. अलीकडेच ‘आई कुठे काय करते’मधील कलाकारांनी स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी मिलिंद गवळींनी बाप्पाची पूजा आणि मराठी सणांचं पावित्र्य राखणं किती गरजेचं आहे याविषयी आपले मत व्यक्त केले आहे.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद गवळी म्हणाले, ‘माझे वडील पोलीस अधिकारी होते. त्यामुळे सणासुदीला ते घरी नसायचे. अशावेळी मला फार वाईट वाटायचं… जिथे गर्दी जास्त असेल किंवा पोलिसांची गरज असेल तिथे त्यांना वेळेत हजर रहावं लागायचं. गणपतीच्या दिवसांमध्ये त्यांना रात्रभर ड्युटी असायची अशावेळी त्यांच्या पायाला सूज यायची. माझ्या वडिलांचे विशेषत: गणपती विसर्जनाच्यावेळी हाल व्हायचे. आपल्या इथे या गोष्टी आता कमी झाल्या असतील मला कल्पना नाही परंतु, आधी मुलं दारु वैगरे पिऊन दंगा- मस्ती करायचे.

आजही मी नेहमी लोकांना सांगतो की, गणपती आणणं ही खूप पवित्र गोष्ट असते. टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाचा मूळ उद्देश अजूनही काही लोकांना माहितीच नाहीये. फक्त ८ ते १० दिवस सुट्टी असते आणि आपल्या इथे मंडप असतो म्हणून तिथे पत्ते खेळायचे या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. काही भागांत आता यामध्ये बराच बदल झाला आहे. तुमच्या परिसरात अशा गोष्टी होत असतील, तर त्या बंद करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे. गणेशोत्सवाचं पावित्र्य जपणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे’. मिलिंद गवळी यांच्या मताशी अनेकांनी आपली सहमती दर्शवली आहे.