मुक्ताने टाकलं अरुंधतीला मागे; TRP’च्या शर्यतीत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेची आघाडी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर अनेक मालिका सुरु आहेत. ज्या कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. यांपैकी काही मालिका तर घराघरांत न चुकता पहिल्या जातात. त्यामुळे मालिकेतील कलाकारांचे प्रेक्षकांसोबत एक वेगळे नाते तयार होत असते. मालिकेचे कथानक, त्यात येणारे वेगवेगळे रंजक ट्विस्ट, कलाकारांचा अभिनय या सगळ्याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होत असतो. दरम्यान नुकतीच गेल्या आठवड्यातील TRP रेटिंगची यादी समोर आली आहे. त्यानुसार अलीकडेच सुरु झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर वरचढ ठरल्याचे दिसून आले आहे.

टीआरपी लिस्टनुसार, तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अगदी अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘मराठी टेल बझ’ या इंस्टाग्राम पेजवर गेल्या आठवड्याची टीआरपी लिस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्याचा फोटो अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये शेअर केला आहे. त्यानुसार, टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर ‘ठरलं तर मग’, दुसऱ्या क्रमांकावर ‘प्रेमाची गोष्ट’ आणि तिसऱ्या क्रमांकावर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आहे.

अर्थात अरुंधतीच्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेला मागे टाकत मुक्ताची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका आघाडी मिळवण्यात यशस्वी झाली आहे. टीआरपीची शर्यत पाहता येत्या काळात जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ आणि तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अव्वल क्रमांकासाठी धडपडताना दिसणार इतकं नक्की. विशेष सांगायचं झालं तर, गेल्या आठवड्यातील टीआरपी लिस्टमध्ये टॉप १० नंबरवर स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका आहेत.