‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे 20’व्या वर्षात पदार्पण; आदेश बांदेकरांनी मानले प्रेक्षकांचे आभार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर गेली १९ वर्ष त्याच उत्साहात सुरु असलेला लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ यंदा विसाव्या वर्षात पदार्पण करतोय. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्गाने विविध खेळ खेळले, पैठणी जिंकली. दार उघड बये दार उघड.. म्हणत सुरु झालेला भाऊजींचा प्रवास अनेक वहिनींच्या साथीने, आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी २०व्या वर्षात पदार्पण करतोय. यानिमित्त आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इंस्टाग्राम लाईव्ह केले होते. यामध्ये त्यांनी ‘होम मिनिस्टर’बद्दल त्यांना काय वाटते..? सांगताना प्रेक्षकांचे आणि कुटुंबाचे आभार मानले.

या व्हिडिओत आदेश बांदेकर बोलताना दिसत आहेत कि, ‘नमस्कार, होम मिनिस्टर या कार्यक्रमाला १९ वर्ष पूर्ण होत आहेत आणि २० व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. साधारण आजपासून बरोबर १९ वर्षांपूर्वी १३ सप्टेंबरला पहिला भाग प्रदर्शित झाला होता आणि तिथून हा प्रवास सुरु झाला. मागे वळून बघताना जवळपास ६००० एपिसोड झाले. मला याचा अतिशय अभिमान वाटतो. जगाच्या नकाशावर सोमवार ते शनिवार आनंद देणारा कार्यक्रम आपल्या प्रत्येकाने त्याचा स्वीकार केला’.

‘घराघरातल्या आई, बहिणी, माऊलींचा सन्मान करत तसेच आनंदाची उधळण करत, घरातलं टेन्शन काही काळ नाहीसा करणारा हा कार्यक्रम करता आला. यामुळे मला छान वाटलं. असंच तुमचं प्रेम कायम ठेवा. होम मिनिस्टर या कार्यक्रमाने १९ वर्षे पूर्ण केली. लाखो कुटुंबांनी मला आशीर्वाद दिला. लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद हे मला कायम समृद्ध करणारा होता.

या निमित्ताने मी माझ्या कुटुंबाला सुचित्रा, सोहम आणि माझे वडील यांना मी धन्यवाद म्हणेन. त्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिलं. घराघरात जाऊन इतका प्रवास करताना त्यांनी मला कधीच नको म्हटलं नाही. त्याच आशीर्वादाच्या जोरावर २० वं वर्षही साजर करुया’. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने जवळपास १० लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करत ६००० भाग आणि १२००० घरांना भेट दिली आहे.