मतदात्याच्या बोटाला ‘शाही’ नाही ‘चुना’; राजकीय परिस्थितीवर उत्कर्ष शिंदेची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाल्याचे आपण पाहिले. राजकारण म्हटलं कि धक्कादायक घडामोडी घडणार यात काही वादच नाही. पण जिथे सत्तांतरणासाठी बाप बदलला जातो तिथे राजकारण काय आणि कसे खेळले जात असेल याचा अंदाज येईल अशी स्थिती महाराष्ट्रात झाली आहे. मागच्या वर्षी राजकारणात झालेल्या सत्तांतरणाचा दुसरा भागच नुकताच अजित पवारांनी रिलिज केला आहे. आपल्याच पक्षासोबत बंड पुकारत त्यांनी शिंदे आणि फडणवीसांसोबत हातमिळवणी केली व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेने सगळ्यांनाच हादरा बसला आणि यावर अनेक राजकीय मंडळी तसेच मनोरंजन विश्वातील मंडळींनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये उत्कर्ष शिंदेचाही समावेश आहे.

राष्ट्रवादीचे आघाडीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राज्याच्या राजकारणात हा राजकीय भुकंप झाला. अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत अन्य ८ आमदारांनीही विविध मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या. यावर उद्धव ठाकरे, शरद पवार , राज ठाकरे, संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या. शिवाय मनोरंजन विश्वातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. यामध्ये उत्कर्ष शिंदेनेही सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गायक, अभिनेता आणि इंटरटेनर उत्कर्ष शिंदेने अधीकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून २ पोस्ट केल्या आहेत. त्यात पहिली स्टोरी शेअर करत त्याने म्हटले आहे कि, ‘मतदात्याच्या बोटाला शाही नाही आता चुनाच चुना’. अशीच आणखी एक स्टोरी शेअर करत यामध्ये उत्कर्षने राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फोटो शेयर केला आहे. सध्या सर्वत्र महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक झालेल्या उलथापालथीचा या घटनेबाबत मोठी चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आता पुन्हा ३ पक्षाचे सरकार आले आहे. ज्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांचा समावेश आहे.