‘तुमची शाब्बासकीची थाप..’; ‘सुभेदार’ची दखल घेतल्याबद्दल लांजेकरांनी मानले सुप्रिया सुळेंचे आभार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘श्री शिवराज अष्टक’ ज्यांच्या अनोख्या संकल्पनेतून उदयास आले ते लोकप्रिय लेखक- दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या ‘सुभेदार’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवे पुष्प आहे. गेले तीन आठवडे ‘सुभेदार’ या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने आता चौथ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. या चित्रपटाविषयी जो तो प्रतिक्रिया देत कौतुकाचा वर्षाव करत आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील ‘सुभेदार’ पाहण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता दिग्पाल लांजेकर यांनी त्यांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे.

अगदी काही दिवसांपूर्वीच ‘सुभेदार’ चित्रपटातील अभिनेते उत्कर्ष कुदळे हे सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीचा फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर करत एक पोस्ट लिहीली होती. यात त्यांनी म्हटलंय, ‘आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उत्कर्ष मनोज कुदळे यांनी काल भेट घेतली. त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये मराठा सरदार मावळाची भूमिका साकारली आहे’.

पुढे लिहिलं, ‘यावेळी त्यांनी चित्रपटाच्या चित्रिकरणावेळीचे किस्से आणि प्रसंगांबद्दल सांगितलं. आपणही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नरवीर तानाजी मालुसरे आणि मावळ्यांच्या बलिदानाची आठवण करुन देणारा ‘सुभेदार’ हा चित्रपट नक्की पाहा’. यानंतर ‘सुभेदार’ चित्रपटाची दखल घेतल्याबद्दल दिग्पाल लांजेकर यांनी सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. सुप्रिया सुळे यांच्या पोस्टचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करून दिग्पाल यांनी लिहीलं की, ‘सुप्रिया ताई…’’फर्जंद’’पासून मिळत असलेली तुमची शाब्बासकीची थाप अशीच कायम पाठीशी राहुदे… तुमचे आशीर्वाद खूप मोलाचे आहेत… असच पाठबळ आणि प्रेम आम्हा मावळ्यांबरोबर कायम असू दे… जय शिवराय..’.