‘जेव्हा तुम्ही भेटलात तेव्हा..’; बिग बॉस फेम अभिनेत्रीने शेअर केला नाना पाटेकरांसोबतच्या भेटीचा अनुभव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाना पाटेकर हे मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अत्यंत मोठे नाव आहे. त्यांचा चाहता वर्ग प्रत्येक वयोगटात आहे. नाना पाटेकर यांचे चाहते सिनेसृष्टीतदेखील आहेत. त्यांपैकी एक म्हणजे बिग बॉस फेम अभिनेत्री सोनाली पाटील. नुकतीच सोनाली पाटील आणि नाना पाटेकर यांची भेट झाली होती. या भेटीचा आनंद सोनालीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या क्षणाचा व्हिडीओ शेअर करत सोनालीने नाना पाटेकर यांच्या भेटीचा अनुभव शेअर केला आहे.

नाना पाटेकर यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर करत सोनालीने लिहिलं कि, ‘जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा ठरवलं होतं या ‘’माणसाला’’ भेटायचं. तसं आम्हा सगळ्याच कलाकारांना आमच्यापेक्षा वयाने, कामाने आणि अनुभवांने मोठ्या असलेल्या लोकांना भेटायचं असतं. पण, तुम्हाला भेटायचं एक वेगळं कारण माझ्याकडे होतं आणि ते म्हणजे ‘स्पोर्ट्स इंडस्ट्री’ आणि ‘मराठी इंडस्ट्री’मध्ये आपण दोघेही काम करतो… मलाही १० मीटर एअर पिस्तुल शूटिंग करायला आवडतं आणि टेलिव्हिजन वरचं म्हणजे नॉर्मल शूटिंग करायलाही आवडतं…तुमचं ही अगदी तसंच आहे. तुम्हालाही पिस्तुल शूटिंग करायला आवडतं आणि इंडस्ट्रीमधल्या शूटिंगबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल ‘‘क्या कहने!!’’ हेच जेव्हा तुम्ही भेटलात तेव्हा सांगायचं होतं की सर, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक गोष्ट ‘‘कॉमन’’ आहे. ती म्हणजे तुम्हालाही पिस्तुल शूटिंग आवडतं, रेंजवरती जायला आवडतं आणि नॉर्मल स्क्रीन शूटिंगही आवडतं … माझं सुद्धा तुमच्यासारखंच आहे बरं का, मी ही १० मीटर एअर पिस्तुल ऑल इंडिया वुमन चॅम्पियनशिप, अमृतसर खेळले आहे. पण बोलायचं तेवढं धाडस झालं नाही. धाडस म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या. त्यामधून ही गोष्ट बोलायचीच राहून गेली’.

पुढे लिहिलंय, ‘कारण एकाच फ्लाईटमध्ये आम्ही प्रवास करत होतो. पण जसं फ्लाईटमधून खाली उतरलो तसं अगदी लहान मुलं पाठलाग करत जातं तसं मी तुमचा पाठलाग करत आले. तुमच्याशी बोलले पण तुमच्यात इतका साधेपणा की, मी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करते, टेलिव्हिजनला काम करते म्हटल्यावर अगदी कौतुकाने तुम्ही माझ्याकडे बघितलं. माझ्याबरोबर मेघाताई होती. तिच्याशी तुम्ही छान बोललात…फोटो घेऊ का? जर तुम्हाला वेळ असेल तर नाहीतर तुम्हाला त्रास नाही देणार ….यावर ते हसून ‘हो अगदीच’, असं म्हणून तुम्ही न थकता, कुठलाही चेहऱ्यावरती भाव न आणता अगदी हसत मुखाने फोटो दिलात ऑल द बेस्ट केलंत. खूप मोठा आणि छान गेला तो दिवस अगदी अविस्मरणीय!!’ सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘वैजू नंबर वन’, ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातही ती दिसली होती.