परदेशात मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी बाप्पाचं आगमन; स्वतःच्या हाताने केलं डेकोरेशन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मंडळींच्या घरीदेखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र वातावरण भक्तिमय, आनंदी आणि उत्साही झाले आहे. जो तो लाडक्या बाप्पाच्या सेवेत रुजू झाला आहे. केवळ देशभरात नव्हे तर विदेशातही बाप्पाचे आगमन करत मराठमोळ्या अभिनेत्रीने परंपरेला खंड पडू दिलेला नाही. लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री उमा हृषीकेश पेंढारकर यंदा न्यूझीलंडमध्ये गणेशोत्सव साजरा करत आहे.

‘स्वामिनी’, ‘अगंबाई सूनबाई’, ‘योग योगेश्वर जयशंकर’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेली मराठी अभिनेत्री उमा हृषिकेश पेंढारकर सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. ती आणि तिच्या पतीने परदेशात यंदा बाप्पाचे आगमन केले आहे. अभिनयातून ब्रेक घेऊन न्यूझीलंडमध्ये गेलेली उमा भारतीय परंपरा मात्र मोठ्या उत्साहाने साजरी करताना दिसत आहे. यंदाचा ती परदेशात गणेशोत्सव साजरा करते आहे. यंदा उमाने बाप्पासाठी खास वारली थीम तयार केली आहे. ज्याचे फोटो तिने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केले आहेत.

दोन दिवस जागून तिने वारली पेंटिंग पूर्ण केली आणि आज तिचा बाप्पा या सजावटीत विराजमान झाला आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिने बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तयारी बाप्पांच्या आगमनाची. यंदा थीम म्हणून वारली पेंटींग करायचं ठरवलं. सलग २ दिवस जागून अखेर आज पूर्ण झालेलं हे डेकोरेशन’. यामध्ये तिचा एक फोटो पेंटिगसोबत आहे. तर दुसऱ्या फोटोत फक्त पेंटिंग दिसतंय. तिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.