प्राजक्ता माळीला मिळाला ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ बाप्पाच्या महाआरतीचा मान


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ढोल-ताशाचा गजर… सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख नादाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या रथात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाचे जंगी मिरवणुकीने वाजत-गाजत आज गणेश चतुर्थीच्या शुभमूहुर्तावर जल्लोषात आगमन झाले. त्यानंतर विधीवत पूजा करून मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भक्तीभावाने बाप्पाची ‘ओंकार महाला’त प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाची सायंकाळची महाआरती करण्याचा मान मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीला मिळाला. यावेळी प्राजक्ताने अत्यंत साधा पेहराव केला होता. सेलिब्रिटी म्हणून तिच्या चेहऱ्यावर कोणताही गर्व दिसत नव्हता.

याउलट बाप्पासमोर प्राजक्ता श्रद्धापूर्वक नतमस्तक झाली आणि तिने बाप्पाचा आशीर्वाद घेतला. महाआरतीचा मान घेताना प्राजक्ताच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्याजोगा होता. टाळ्यांचा गजर आणि आरतीच्या भक्तिमय सुरांमध्ये संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

यावेळी उपस्थित भाविकांनी देखील बाप्पाच्या मनमोहक रूपाचे दर्शन घेत महाआरतीचा लाभ घेतला. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाप्पाचे ओंकार महालात आगमन झाले. त्यानंतर ज्येष्ठ तबला वादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी माहिती देताना म्हटले कि, ‘पुढील दहा दिवस आमच्या ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच गणेश भक्तांसाठी आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.