हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला. यानंतर आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता तुफान वाढली आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र यात पाहायला मिळणार आहे. हे आत्मपॅम्फ्लेट येत्या ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी यासारख्या भन्नाट चित्रपट देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे.
आपल्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणाले कि, ‘आत्मचरित्र थोरामोठ्यांचीच असतात असा सर्वसाधारण नियम आहे, पण अत्यंत सामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असूच शकतं, आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं हेच ‘आत्मपॅम्फ्लेट’ मधून मांडण्यात आले आहे. कोवळ्या वयातील ही वरकरणी एक प्रेमकथा वाटेल पण नक्कीच हा सिनेमा त्याहूनही बरच काही सांगण्याचा प्रयत्न करतो. यातील प्रत्येक पात्र आपल्या आजूबाजूला दिसणारे आहे. प्रत्येकाला ही स्वतःचीच गोष्ट वाटेल. आपल्या आवडत्या काळाचा नॉस्टॅलजिया देणारा आणि प्रत्येक वयोगटासाठीचा हा चित्रपट असेल’.
या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अत्यंत वेगळे नाव आणि तितकेच भन्नाट कथानक या चित्रपटासाठी उजवी बाजू ठरत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर तर अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये कधी पाहतो.. अशी उत्सुकता निर्माण झाल्याचे म्हटले आहे. एकंदरच नावावरून हा चित्रपट काहीतरी हटके असणार आहे याचा अंदाज आता प्रेक्षकांनाही लागला आहे. त्यामुळे प्रेक्षकही ६ ऑक्टोबर २०२३ या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.