‘इतकं गोड खाऊ नका…’; चिमुकल्या जीजाने दिल्या लाडक्या बाप्पाला हेल्थ टिप्स


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच बाप्पाचं कोड कौतुक करण्यात सध्या बिझी आहेत. राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम एकदम जोरदार सुरु आहे. घरोघरी लाडका बाप्पा विराजमान झाला आहे. त्यामुळे घराघरात गोडधोड आणि विशेष करून बाप्पाचे प्रिय मोदक बनत आहेत. मोठ्यांइतकंच लहानांनासुद्धा बाप्पाचं वेड असतं ते काही खोट नाही. ही लहान मुलं बाप्पावर जेव्हढं प्रेम करतात तेव्हढीच त्यांची काळजीसुद्धा करतात. म्हणूनच आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे यांच्या लेकीने चक्क बाप्पाला हेल्थ टिप्स दिल्या आहेत.

अभिनेता आदिनाथ कोठारेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांची लेक जीजा लहानपणापासूनच सोशल मीडियावर कायम चर्चेत राहिली आहे. तिचे वेगवेगळे क्युट व्हिडीओ कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर जीजाने आवर्जून तिच्या लाडक्या बाप्पाला हेल्थ टिप्स दिल्या आहेत. ज्यामध्ये थोडासा गोडवा आणि थोडासा दम आहे. आदिनाथने लेकीचा हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे.

आदिनाथ कोठारेने शेअर केलेल्या व्हिडिओत तो आणि जीजा गाडीमध्ये दिसत आहेत. ज्यामध्ये जीजा ‘किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला, इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला…’ हे गाणं गाताना दिसतं आहे. या व्हिडीओत जीजा गाणं गातेय तर तिचा डॅडा म्हणेजच आदिनाथ त्यावर हावभाव देताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत आदिनाथने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ‘जीजा आणि डॅडाकडून बाप्पाला हेल्थ टिप आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा’. या व्हिडिओवर नेटकऱ्यांसह अनेक कलाकार मंडळींनी देखील कमेंट करत जिजाचे कौतुक केले आहे.