बोल बोबडे.. खोल भक्ती..!! प्राजक्ता माळीच्या भाचीला ‘गणपती स्तोत्र’ तोंडपाठ; व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंद आणि उत्साह पसरला आहे. सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सगळेच बाप्पासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. बाप्पाचे आगमन हर्षोल्लास निर्माण करणारे असते. या दिवसात लोक एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा उत्साह पाहण्याजोगा असतो. अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर गणेश चतुर्थीचा खास व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची भाची चक्क गणपती स्तोत्राचे संस्कृतमध्ये पठण करताना दिसत आहे. तिच्या बोबड्या बोलांमध्ये तिच्या मनातील शुद्धता आणि प्रार्थनेतील पावित्र्य दिसून येत होते. प्राजक्ताच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे आणि यानिमित्त तिने भाचीचा हा गोड व्हिडीओ शेअर केला आहे. इतकेच नव्हे तर यासोबत तिने काही फोटो शेअर करत गणेश चतुर्थीचा दिवस कसा होता ते सांगितले आहे.

हा व्हिडीओ आणि सोबत काही फोटो शेअर करताना प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘भाचीचं गणपती स्तोत्र पठण, मानाच्या ५ गणपतींच दर्शन, भाऊ रंगारी – महाआरती, घरात पुरी- भाजी श्रीखंड बेत, ४ उकडीचे १ तळलेला मोदक फस्त. गणेश चतुर्शी उत्साहात साजरी झाली’. प्राजक्ताने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या फोटोमधून पुण्यातील मनाच्या गणपती बाप्पांचे दर्शन झाल्याबद्दल तिचे आभार मानले आहेत.