जय भीम!! ‘भाकरीवरच नाय.. पिझ्झा- बर्गरवरबी बाबासायबांचीच सही हाय’; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता किरण माने कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आजही त्यांनी सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अमित भुतांगे या तरुणाची गोष्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘जय भीम’ असाही उल्लेख केला आहे आणि याला एक कारण आहे. जाणून घेऊया काय आहे हि पोस्ट…

अभिनेते किरण माने यांनी लिहिलंय, ”’जयभीम”… कसं थाटात आन् टेचात ल्हिवलंय नंबरप्लेटवर. ऑस्ट्रेलियात र्‍हानार्‍या आपल्या दोस्ताची बीएमडब्ल्यू हाय ही भावांनो ! …मला आलेल्या फ्रेन्ड रिक्वेस्ट मी शक्यतो तपासून ॲक्सेप्ट करतो. अशीच एक रिक्वेस्ट आली. त्यावर ह्यो नादखुळा फोटो दिसला. नवल वाटलं. पोस्ट पाहिली, तर आंबेडकर जयंतीची ही पोस्ट होती. त्यावर कॅप्शन लिहीलीवती, ‘बापाचा दिवस नसतो. आपला प्रत्येक दिवस त्या बापामुळेच असतो.’… क्युरीऑसिटी वाढली. या भन्नाट मानसाशी संपर्क साधला. दूर असला तरी हा आपला हमदम, हम-नफ़स निघनार याची खात्री होतीच, ती पक्की झाली. म्हन्ला, ‘तुम्ही समविचारी आहात, म्हणून मैत्रीचा हात पुढं केला. अमित भुतांगे ! नागपूरचा. सध्या ॲडलेड इथं फिजीओथेरपीस्ट म्हणून नांव कमावतोय. तिथंच स्थायिक झालाय. निव्वळ टॅलेंटच्या बळावर मोठा झालाय… ऐश्वर्यसंपन्न झालाय… पन तरीबी आपली पाळंमुळं इसरलेला नाय. आपल्या शिक्षनाचा पाया ज्याच्यामुळं घातला गेला, त्या बापाला काळजात जपून ठेवलंय. ”आपन खातो त्या भाकरीवरच नाय, तर ब्रेड- बटर, पिझ्झा- बर्गरवरबी बाबासायबांचीच सही हाय” याची जानीव ठेवलीय’.

‘हे प्रेम फक्त गाडीवर ”जयभीम” ल्हीन्यापुरतं नाय बरं का… आपल्यापैकी बर्‍याचजनांना वाटंल, त्यात काय विशेष..? लै जन अशी महामानवांची नांवं गाडीवर लिहीत्यात. म्हनून त्यापुढं जाऊन या मानसाविषयी मी जानून घेतलं, आन् नंतर खर्‍या अर्थानं भारावलो. आज ऑस्ट्रेलियात व्यवसाय भरभराटीच्या शिखरावर असूनबी अमितनं बाबासाहेबांचा आदर्श घेत, सामाजिक भान जपलंय. इंडीयामधल्या उपेक्षित, वंचित समाजातल्या हुशार पोरांना हेरून, त्यांना करीयर गायडन्स करनं… उच्च शिक्षनासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये संधी मिळवुन देनं, अशी कामं मनापास्नं आनि आनंदानं करतो हा आपला दोस्त! शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांचे ”खरेखुरे” विचार ज्यानं मनामेंदूत मुरवून घेतलेत, तो कुठल्याही क्षेत्रात जाऊदेत… कुठल्याही प्रांतात जाऊदेत… कुठल्याही देशात जाऊदेत… न डरता, न लाजता, कुनाचीबी भिडभाड न ठेवता आपल्या महामानवांच्या विचारांचा दरवळ पसरवनार… हे जग सुंदर करनार !सलाम मित्रा अमित. लब्यू लैच. जय शिवराय… जय भीम!’