हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. अभिनयापेक्षा जास्त त्यांच्या वक्तव्यांची चर्चा कायम असते. देशाचा इतिहास, राजकीय घटना, सामाजिक परिस्थितीविषयी ते कायम आपले परखड मत मांडताना दिसतात. शरद पोंक्षे मुख्य भूमिकेत असलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक २०१७ साली थांबवण्यात आले होते. पण हे नाटक आता ऑक्टोबरमध्ये पुन्हा नव्याने रंगभूमीवर येत आहे. दरम्यान या प्रयोगांमुळे शरद पोक्षेंना अनेक प्रसंगांना सामोर जावं लागलं होतं. यापैकी एक प्रसंग त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितला.
एका मुलाखतीदरम्यान शरद पोंक्षे यांनी सांगितले कि, ‘सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्यावर १० जुलै १९९८ पासून आमच्या नाटकाचे प्रयोग सुरु झाले आणि कोणीही विचार करू शकणार नाही असे अनुभव आम्हाला येऊ लागले. एखाद्या नटाने या नाट्यसृष्टीत ४० ते ५० वर्ष काम केल्यावर त्याला जे अनुभव येतात ते सगळे अनुभव मला या एकाच भूमिकेने दिले. मला पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्यापासून ते आमच्या नाटकाची संपूर्ण बस जाळण्यापर्यंत सगळं काही मी पाहिलं. एवढंच नव्हेतर रंगमंचावर नाटक सुरु असताना कॉंग्रेसचे ५० ते ६० लोक एकदम धडाधड वर यायचे आणि हे लोक मला घेराव घालून उभे राहायचे. असे अनेक अनुभव मला या नाटकामुळे आले. हे सगळे अनुभव घेत असताना रसिक प्रेक्षकांनी कधीच हाऊसफुलचा बोर्ड खाली उतरू दिला नाही’.
‘महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना मानलंच पाहिजे कारण, बाहेर शरद पोंक्षे मुर्दाबाद, नथुराम गोडसे मुर्दाबाद, महात्मा गांधी की जय असं म्हणत असताना अशा परिस्थितीतून सुद्धा प्रेक्षक नाटक पाहायला येत होते आणि आमचे प्रयोग हाऊसफुल्ल होत होते. २० वर्षात ११०० प्रयोग झाले, पण आमचा एकही प्रयोग रिकामी गेला नाही…सगळे प्रयोग हाऊसफुल झाले. याशिवाय आम्ही एकही प्रयोग रद्द केला नाही. मी कधीच घाबरलो नाही… माझ्या चारही बाजूंनी लोक येऊन मला घेराव घालायचे. या सगळ्यात मी ताकदीने उभा राहिलो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आमच्या पाठिशी अतिशय खंबीरपणे उभे राहिले होते’.