TRP’च्या शर्यतीत तेजश्रीची बाजी; अरुंधती, सायलीला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ने पटकावला पहिला नंबर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील जवळपास सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. त्यामुळे प्रेक्षक दररोज न चुकता या मालिका आवर्जून पाहतात. शिवाय अलीकडेच सुरु झालेल्या नव्या मालिकांनादेखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर होती. पण या आठवड्यात बाजी फिरली आहे. या आठवड्याच्या टीआरपी शर्यतीत तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अलीकडेच ४ सप्टेंबर २०२३ पासून सुरु झाली आहे. खरंतर ही मालिका ‘ये है मोहब्बतें’ या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे. असे असूनही या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अवघ्या दोन आठवड्यात या मालिकेने टॉप १० मालिकांच्या यादीत स्थान मिळवलं आणि आता तर टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या नंबरवर आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने या आठवड्याचं टीआरपी रेटिंगची लिस्ट तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

सध्या टीआरपीच्या टॉप १० लिस्टमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील बऱ्याच मालिकांचा समावेश आहे. यात ‘आई कुठे काय करते’, ‘ठरलं तर मग’ या मालिका तर टीआरपीत कायम आघाडीवर राहिल्या आहेत. पण आता चक्र फिरलं असून तेजश्रीच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने टीआरपी यादीत अव्वल नंबर मिळवला आहे.

तेजश्रीने शेअर केलेल्या पोस्टनुसार, आता ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ६.८ टीआरपीसह पहिल्या स्थानावर आहे. तर जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ हि मालिका ६.७ टीआरपीसह दुसऱ्या आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका ६.५ टीआरपीसह तिसऱ्या स्थानी आहे.