हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रुचिरा जाधव ही सध्या कमालीची चर्चेत आहे. रुचिरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे वेगवेगळे फोटो, लूक, व्हिडीओमुळे ती कायम चर्चेचा विषय ठरते. सध्या गणेशोत्सव सुरु असून अनेक सेलिब्रिटी मंडळी मुंबईचे आराध्य लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. यांमध्ये रुचिरा जाधवचा देखील समावेश आहे. पण लालबाग राजाला जाणाऱ्या सेलिब्रिटींची गर्दी पाहून नेटकरी आता ट्रोल करू लागले आहेत. या ट्रोलिंगला रुचिराने प्रत्युत्तर दिलं आहे.
मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आतापर्यंत लालबाग राजाच्या दर्शनाला गेल्याचे आपण पाहिले. उत्सवाच्या पुढील काळात देखील अनेक मंडळी दर्शनासाठी येताना दिसतील. दरम्यान अलीकडेच रुचिराने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. यामध्ये ‘.. यांना बरोबर लगेच पुढे घेतात’, ‘सेलिब्रिटी असल्याचा हाच फायदा असतो’, ‘बाकीच्या मंडळांचे देव पण पावतात बरं का नवसाला..’ अशा बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत. यातील एका कमेंटला रुचिराने रोखठोक उत्तर देत स्वत:ची बाजू मांडली आहे.
अभिनेत्री रुचिरा जाधव म्हणाली कि, ‘मी नवस करत नाही.. मी बाप्पाला भेटायला जाते आणि मुळात नेहमी काहीतरी मागण्यापेक्षा जे दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आवडतं मला..’. रुचिराने दिलेल्या प्रत्युत्तराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान, रुचिराच्या या उत्तरानंतर ट्रोलिंग करणाऱ्यांची बोलती बंद होईल असे वाटले होते. पण ट्रोलिंग काही थांबायचे नाव घेईन. उलट अन्य नेटकऱ्यांनी रुचिराला कधीतरी सामान्य भाविकांच्या लाईनमधून दर्शन घेऊन बघ मग कळेल.. असे म्हटले आहे. तसेच काहींनी म्हटले कि, ‘भेटायला जातेस तर फोटोसेशन कशाला करतेस..?’