‘जबाबदारी फक्त सरकारची नाही…’; उत्कर्ष शिंदेचा 400 विद्यार्थ्यांसह बीच क्लिनिंगमध्ये सहभाग


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक घराणे म्हणून शिंदे कुटुंबाची ख्याती आहे. या शिंदेशाहीचा अविभाज्य भाग असणारा उत्कर्ष शिंदे हा डॉक्टर, ऍक्टर, सिंगर आणि इंटरटेनर सुद्धा आहे. उत्कर्ष सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. शिवाय त्याची गाणीदेखील कायम गाजताना दिसतात. अलीकडेच आलेले त्याचे ‘मी कार्यकर्ता’ हे गाणे रसिकांच्या पसंतीस पडल्यानंतर आज उत्कर्षने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. शनिवारी पाच दिवसाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बीच क्लिनिंग मोहिमेसाठी काही विद्यार्थ्यांसोबत उत्कर्षने सहभाग घेतला.

उत्कर्षने काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘महाराष्ट्र आपला, उत्सव आपला, बाप्पा आपले , तर जबाबदारीही आपलीच …..!! आपल्या सर्वांचा आवडीचा गणेशोत्सव सुरू आहे. ५ दिवसाच्या गौरी गणेशाचे विसर्जन ही झाले आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी अनेक समुद्र किनारपट्टीही सुसज्ज होत्या पण याही वेळेस काही प्रमाणत जल प्रदूषण हे नेहमी प्रमाणे दिसून आलेच. कमीत कमी प्रदूषण करत आपले सण साजरे करू. हाच विचार मनी ठेऊन काल “क्लिनेथोन ५.०” बीच क्लीनिंगमधे असंख्य मुंबईतील विद्यार्थ्यांसोबत मी सहभाग घेतला’.

‘पर्यावरण रक्षणासाठी सरकार जागरूक आहे. परंतू ही जबाबदारी फक्त सरकारचीच नाही. यासाठी आपण सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. जे काही निसर्गाची देन आपल्याला लाभली आहे, तिला सांभाळून ठेवणे. तसेच प्रकृतीला आपल्या कृत्यामुळे कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घेणे. पर्यावरणाचा ढासाळत चाललेला हा समतोल सांभाळणे आता आपली जबाबदारी आहे. जर आपण आज पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर भविष्यात आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे निश्चित. समाजौन्नती कॉलेज,युनायटेड फॉर ग्रेटर कॉस,रजनी फाउंडेशन इंडिया सोबत काल २४ सप्टेंबर रोजी मी “क्लीनथोन ५.०“ सहभाग घेत स्वच्छता अभियान राबवलं’.