हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री नम्रता संभेराव सोशल मीडियावर फार सक्रिय असते. विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत नम्रता कायम आपल्या विनोदी शैलीने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांचा हसवत असते. गणेशोत्सवानिमित्त अलीकडेच नम्रताने एका नामवंत माध्यमाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने लालबाग- काळाचौकी परिसरातील गणेशोत्सवाच्या आठवणी सांगितल्या आहेत.
अभिनेत्री नम्रता संभेराव ही मूळ लालबाग- काळाचौकी या परिसरातील मुलगी आहे. लालबाग- काळाचौकीतील एका चाळीत नम्रताचं बालपण गेलं. त्यामुळे येथील परिसर तिच्या ओळखीचा आणि अत्यंत जवळचा. इथल्या गणेशोत्सवासोबत तिचा फार जवळचा संबंध आहे. दरम्यान तिने दिलेल्या या मुलाखतीत लालबागचा राजा आणि या परिसरातील इतर गणपतींच्या दर्शनाबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘गणेशोत्सव हा माझा आवडता सण. लालबागचा गणपती हा माझ्या घरापासून अगदी दोन मिनिटांवर आहे. आम्हा सगळ्या लालबागकारांसाठी तो हिरोच! गणेशोत्सवात हा परिसर उत्साहपूर्ण वातावरणानं भारलेला असतो. मी लहान असताना कधीही जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचे. पूर्वी मुखदर्शन किंवा आतासारखे सेलिब्रिटी स्टेट्स, सोहळे नसायचे. त्यानंतर थोडी मोठी झाल्यानंतरसुद्धा मी तासनतास रांगेत थांबून दर्शन घ्यायचे’.
‘लालबागचा राजा असो, मुंबईचा राजा किंवा दुसरा बाप्पा हा एकच असतो, असं मला वाटतं. लग्नानंतर मी स्वतःच्या घरी बाप्पाची मूर्ती बसवते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीमधून प्रेरणा घेऊन घरची मूर्ती बनवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्या रुपातून बाप्पा घरीच भेटायला येतो. एरवी आपण कामात इतके व्यग्र असतो, पण बाप्पाचं घरी आगमन झाल्यावर सगळे एकत्र जमतात. काळाचौकी, लालबागसारख्या भागात सगळेच सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात, ते आजही तसंच आहे. वाहतूक कोंडीबद्दल कितीही तक्रार असली, त्याचा कितीही त्रास होत असला तरी त्या सणांदरम्यान तिथल्या रस्त्यांवर असलेली गर्दी ही हवीहवीशी वाटतेच. काही आठवडे आधीच फुलणारा लालबागचा बाजार आज मला खुणावतो.