हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सव आणि पुणे यांचं एक अनोखं नातं आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अख्खं पुणे शहर मोरयाच्या नादात तल्लीन झालं. अखेर आज निरोपाचा क्षण आला आणि बाप्पाला निरोप देताना जो तो भावुक झाल्याचे दिसून आले. नुकतीच ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. यंदा बाप्पाच्या मिरवणुकीसाठी आकर्षक ‘मयूरपंख रथ’ तयार करण्यात आला आहे. या रथामध्ये गणपती बाप्पा विराजमान होऊन परतीच्या दिशेने निघाले आहेत.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’ बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने हा भव्य असा मयूर पंख रथ सजविण्यात आला आहे. दरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले यांनी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा हा भव्य रथ ओढला. तसेच मंडळातील इतर सदस्यांसोबत आणि कार्यकारीणींसोबत बाप्पाचा जयघोष करत सिद्धार्थ, सौरभने बाप्पाची सेवा करण्याचा लाभ घेतला आहे. बाप्पाचा रथ ओढताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, आनंद आणि समाधान अगदी पाहण्याजोगे होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदादेखील ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने ढोल- ताशा पथके जोरदार वादन करताण दिसत आहेत. या पथकांमध्ये समर्थ पथक, रमणबाग पथक, श्रीराम पथक या तीन पथकांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर बाप्पाच्या मयूर पंख रथासमोर पारंपरिक मर्दानी खेळांचेही प्रात्यक्षिक जगभरातील गणेश भक्तांना आणि पुणेकरांना आकर्षित करत आहे. नियमांचे पालन करत आणि भाविकांच्या श्रद्धेचा मान ठेवत बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीचा जल्लोष पहायला मिळत आहे.