‘मनात भीती किंवा दडपण होतं..’; ‘वर्षा’ बंगल्यात जाऊन आल्यानंतर हेमांगीने शेअर केलेली पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हे मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. हेमांगीने चित्रपट, वेब सिरीज, नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे हेमांगी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती अनुभव, किस्से आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असते. तिच्या पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसतात. आजही तिची एक पोस्ट व्हायरल होत आहे. नुकतीच मराठी कलाकार मंडळींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी हेमांगी तिच्या पतीसोबत उपस्थित होती. या क्षणाचा आनंद आणि अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेमांगीने हि पोस्ट शेअर करताना लिहिलं कि, ‘जेव्हा थेट ”वर्षा” वरून बोलावणं येतं! महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शन आणि आशीर्वादासाठी आमंत्रित करून मान दिल्याबद्दल खरंच खुप खुप आभार. वर्षा बंगल्यात त्यांच्याबरोबर बाप्पाची केलेली आरती हा एक आल्हाददायक अनुभव होता जो कायम स्मरणात राहील! एवढंच नाही तर सौ. लताताईं, वृषाली वहिनी आणि त्यांची मंडळी अगदी घरच्यांप्रमाणे प्रेमाने आमच्या पाहुणचाराची विचारपूस करत होते. असं वाटलं जणू आपल्या जवळच्या नातेवाईकाकडेच सणाला आलो आहोत! कसलीच औपचारिक्ता नाही. आता सिक्युरिटी रिझन्समुळे काही गोष्टी नाही शेअर करू शकत पण बंगल्यात शिरताना मनात जी भीती किंवा दडपण होतं ते आत गेल्यानंतर एकदम नाहीसं झालं! मंगेश देसाई तुझ्यामुळे हे शक्य झालं त्याबद्दल तुला अनेक धन्यवाद!! यानिमित्ताने कित्येक वर्षांपासून कुतूहलाचा विषय असलेला आणि बाहेरून पाहत आलेलो ‘वर्षा’ आतून पाहण्याची ईच्छा पुर्ण झाली! खरं सांगायचं तर त्या वास्तूबद्दलचं असलेलं आकर्षण पुढच्या अर्ध्या तासात संपून त्यात राहणाऱ्या व्यक्तीवर केवढी मोठ्ठी जबाबदारी आहे या जाणिवेने आदर वाढायला लागतो!’

‘घरात गणपती आहेत म्हणून जरा निवांत असतील मुख्यमंत्री तर छे! पाहुण्या मंडळींमधून त्यांच्या नकळत वेळ काढून मध्ये मध्ये आत जाऊन कामकाज करणं, कसल्याशा Files वर त्यांच्या कर्मचाऱ्यांना सह्या देणं एकीकडे चालूच होतं. मी जरा दबकतच माझ्या ओळखीच्या व्यक्तीला विचारलं की…गणपतीच्या एवढ्या सगळ्या गडबडीत आणि तेही एवढ्या late कसल्या सह्या चालंल्यात? तर म्हणाला “उद्याच्या सार्वजनिक सुट्टीबद्दल असू शकतं काहीतरी.” मी पुढे म्हटलं “राज्याच्या कारभारासोबत गेल्या दहा दिवसांतला गोतावळा सांभाळायचा, लाखो लोकांना personally भेटायचं, त्यांचं स्वागत करायचं, विचारपुस करायची, बरं तिथं गेलेल्या प्रत्येकाला वाटतं त्यांच्या बरोबर photo हवाच त्यासाठी कुणालाही नाराज न करता, protocols सांभाळत लाखो photos साठी उभं राहयचं. उत्सहाच्या भरात मी पण त्यांना photo साठी विचारल्याचं आठवलं, लाज वाटली आणि त्यांच्याबद्दल वाईट ही वाटलं! म्हटलं “अशाने यांना थकायला होत नसेल का?” तर तो म्हणाला “इथं असंच काम चालतं! आपल्या ठाण्यातसुद्धा आधी असंच काम करायचे की! न थांबता, अविरत!” मी मनात म्हटलं “गणपती बाप्पा यांना एक माणूस म्हणून शक्ती देओ आणि मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातून महाराष्ट्राचं, आम्हां नागरिकांचं अधिक कल्याण घडो!” खरंच राजकारण, समाजकारण! सोप्पं नाही गड्या!