‘भिंत नंगू पंगू झालेली..’; क्रांती रेडकरच्या जुळ्या लेकींची गोड करामत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रांती रेडकर हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती कायम तिच्या अभिनयामुळे आणि नृत्य कौशल्यामुळे चर्चेत असते. शिवाय सोशल मीडियावर सक्रिय असणारी क्रांती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असते. अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या जुळ्या मुलींचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. गणेशोत्सवातदेखील तिने तिच्या मुलींचा प्रार्थना करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर आता आणखी एक व्हिडीओ शेअर करून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर कायम सोशल मीडियावर तिच्या दोन जुळ्या गोंडस मुलींचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करताना दिसते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरलदेखील होत असतात. अशातच नुकताच क्रांतीने तिच्या मुलींचा आणखी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या मुलींची एक गोड करामत आपण पाहू शकतो. भिंतीचा पापुद्रा निघाला म्हणून तिच्या लेकींनी चक्क बँडेज लावून भिंत झाकली आहे. यानंतर क्रांती आणि तिच्या लेकीचं गोड संभाषण सुरु होतं. ज्यामध्ये क्रांतीची लेक गोदू सांगते कि, ‘भिंत नंगू पंगू झालेली ना.. ते निघलेलं म्हणून लावलं’.

याशिवाय क्रांती रेडकरची छबिल नावाची मुलगी तिच्या कुटुंबीयांची नवीन नाव सांगताना ऐकू येत आहे. यावेळी ती म्हणते की, ‘माझं नवीन नाव गणपती, गोदूचं नाव कार्तिक आणि माझ्या बाबांचं नवीन नाव शंकर भगवान आहे’. या व्हिडिओसोबत क्रांतीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘१० दिवसांत लहान मुलांची आपल्या लाडक्या गणूशी मैत्री होते हेच खरं. छबिलनं आमच्याकडे गणू फॅमिली बनवली आहे’. क्रांतीच्या मुलींचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.