छ. संभाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ येतोय, लवकरच…


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या ‘सुभेदार’ चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटामधील गाणी, संवाद तुफान हिट ठरले. सुभेदारने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली असून आता दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर यांनी आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचं नाव ‘शिवरायांचा छावा’ असा आहे.

दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. यासोबत ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील समोर आली आहे.

या पोस्टमध्ये लिहिलं,
‘उजळला तेजाने, पुरंदराचा माथा
सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा
शत्रू होई परास्त, असा ज्याचा गनिमी कावा
शिवशंभूचा अवतार जणू अवतरला ”शिवरायांचा छावा”… छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा!’ सादरकर्ते, श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!’ या पोस्टनुसार, ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे.