माधुरी पवारला लग्नासाठी कसा मुलगा हवा..? अपेक्षा सांगत म्हणाली, ‘तो खूप श्रीमंत असावा..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नृत्यांगना आणि अभिनेत्री माधुरी पवार हि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. स्टेज शो आणि मालिकांच्या माध्यामातून माधुरीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. संघर्षमयी वाटचालीतून आज तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अतिशय खडतर आणि कठीण काळ पाहिलेल्या माधुरीने झोपडपट्टीतील पत्र्याच्या घरात राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलंय.

पण सध्या ती अभिनय क्षेत्रात अगदी मनापासून कार्यरत आहे आणि आनंदाने ती स्वतःच्या कुटुंबाप्रति असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. दरम्यान अनेकांनी अनेकदा तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारले आहेत पण तिने अद्याप विचार नाही असेच सांगितले. यानंतर अलीकडेच एका नामवंत वाहिनीशी बोलताना तिने तिला लग्नासाठी कसा मुलगा हवा? याबद्दल खुलासा केलाय.

एका प्रसिद्ध वृत्त बहिणीसोबत बोलताना माधुरीने सांगितले कि, ‘मी लग्न करेन की नाही, हाच मोठा प्रश्न आहे. मला आता तरी लग्न करावं असं वाटत नाही. कारण करिअर आणि इतर जबाबदाऱ्या खूप आहेत. या सगळ्यात मला एक जोडीदार मिळाला तर त्याला उत्तम मराठी यायला हवं. कारण माझं मराठीवर खूप प्रेम आहे. त्याला महाराष्ट्राचा इतिहास माहीत असावा. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द त्याला माहीत असावी. तो स्त्रीचा, तिच्या मतांचा आदर करणारा असावा. तो त्याच्या आई-वडिलांचा आदर करणारा असावा. जर तो त्याच्या पालकांचा आदर करत असेल तरच तो माझ्या आई- वडिलांचा आदर करू शकेल’.

पुढे म्हणाली, ‘तो खूप श्रीमंत असावा, प्रचंड पैसा कमावणारा असावा असं नाही. माझाही साड्या आणि चपलाशिवाय फार खर्च नाही. त्यामुळे जेमतेम कमावणारा असेल तरीही चालेल. दिसायला तो खूप सुंदर असावा असंही नाही. मला सावळी मुलं खूप आवडतात. मीही सावळीच आहे, त्यामुळे सावळी, गव्हाळ रंगाची मुलं छान वाटतात. कारण त्यांचा स्मार्टनेस खूप अफलातून असतो. मुलाचे केस चांगले असावे, माझ्यापेक्षा थोडा उंच असावा आणि आयुष्यभर माझं ऐकणारा असावा’.

स्वतःबद्दल बोलताना माधुरी म्हणाली, ‘मी टॉम बॉयसारखी पण आहे, थोडी बालिशही आहे, गंभीरही आहे, परखड मतं मांडणारी आहे. मी स्वतःचाच विचार करते तेव्हा मला वाटतं की मला सांभाळणं खूप कठीण आहे. माझ्याशी लग्न करणं ही मोठी रिस्क आहे. अर्थात लग्न केल्यानंतर तो माझ्याबरोबर खूशही असेल’.