हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाला हात घातला आहे. या लोकप्रिय मालिकेचा आता नवा अध्याय लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या अध्यायातून आपण सिंधुताईंचा हृदयस्पर्शी आणि असामान्य जीवन प्रवास पाहिला. चिंधीचे बालपण, तिचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी यातून पाहिली. आता मात्र चिंधीने सिंधू बनण्याचा विलक्षण प्रवास सुरु केला आहे ज्याचे साक्षीदार आपण होणार आहोत. सिंधूच्या जीवनातील अनेक आव्हाने, कठीण प्रसंग, हलाखीची परिस्थिती आणि यामधून मार्ग काढत त्यांनी सिंधू बनण्याचा प्रवास कसा पार केला…? हे आता पहायला मिळणार आहे.
‘सिंधुताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’ मालिकेचे हे नवे पर्व १५ ऑक्टोबर २०२३ पासून संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. आतापर्यंत मालिकेत छोट्या चिंधीची भूमिका बालकलाकार अनन्या टेकवडेने साकारली. यानंतर आता सिंधूची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सोनारच्या पदरी पडली आहे. या भूमिकेविषयी अत्यंत आदर बाळगत मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी शिवानी सज्ज झाली आहे. या भूमिकेविषयी बोलताना शिवानी म्हणाली कि, ‘या भूमिकेसाठी मी माईंनी लिहीलेलं पुस्तक वाचलं. माईंना भेटणं माझ्या नशिबात नव्हतं पण जी माणसं त्यांना भेटली आणि माझ्या मित्रमंडळीपैकी ज्यांना भेटण्याचा योग आला त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकत मी या भूमिकेसाठी तयारी केली होती आणि अजूनही करत आहे’.
‘शूट सुरु झाल्यानंतर, मी शहरात वाढलेली मुलगी आहे तर गावाकडची कामं, गावाकडे राहणं याची कुठे तरी तयारी नव्हती पण आता मी ह्या वातावरणाला जुळवून घेण्याचा प्रयत्न करते आहे. ह्या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी असल्यामुळे कुठे तरी थोडा नर्व्हसनेस आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी १०० टक्के केला आहे. माझ्या आधीच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं त्याचप्रमाणे या भूमिकेसाठी ही देतील याची मला खात्री आहे. माईंची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न मी आणि आमची संपूर्ण टीम करत आहोत. मालिकेचे दिग्दर्शक, कलाकार या सर्वांचा मला पाठिंबा आहे. लवकरच सिंधू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा करते’.