दिग्गज गायिका अनुराधा पौडवाल यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भावगीतांना आपल्या सुरेल आवाजाने कर्णमधुर बनविणाऱ्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. नुकताच त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचच्या वतीने देण्यात येणारा हा राज्यस्तरीय ‘जीवन गौरव’ पुरस्कार यंदा पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर ज्येष्ठ पत्रकार, लेखक मधुकर भावे यांना ‘गौरव’ पुरस्कार आणि प्रसिद्ध ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय कथाकथनकार प्रा. आप्पासाहेब खोत यांना ‘साहित्यरत्न’ आणि स्वामी समर्थ केंद्राचे आधारस्तंभ गोवर्धन दबडे यांचा ‘क्रांती’ पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या गुरुवारी १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता विक्रमसिंह मैदानावर पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती, मंचचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बंडा मिणियार यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी ते म्हणाले, ‘इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते, आमदार विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुरेश कुराडे यांच्या उपस्थितीत या मानाच्या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या पुरस्कारांची निवड समितीचे अध्यक्ष कथाकथनकार बाबासाहेब परीट यांनी केली आहे. अनुराधा पौडवाल यांनी आशिकी, दिल है की मानता नही, सडक, दिल, बेटा आणि साजन यांसारख्या चित्रपटातील गाण्यांना आवाज देऊन गायन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज प्रत्येक वयोगटात त्यांचा चाहता वर्ग आहे.