खवय्यांसाठी सज्ज होतंय ‘वदनी कवळ’; अभिनेत्रीने शेअर केली नव्या हॉटेलची पहिली झलक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वातील बरेच कलाकार अभिनयासोबत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कुणी बँकेत जॉब करता करता अभिनय क्षेत्रात अग्रेसर आहे. तर कुणी वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करत आहे. अलीकडच्या काळात अभिनेते आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, आई कुठे काय करते फेम अभिनेता निरंजन कुलकर्णी, अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे अशा बऱ्याच कलाकार मंडळींनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने नवं हॉटेल सुरु केलं आहे.

‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलनेसुद्धा हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनघाने नवीन हॉटेल सुरू करणार असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून अनघाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पाडली आहे. अनघा अतुल ही भगरे गुरूजी यांची कन्या आहे. तिने भावासोबत पुण्यातील डेक्कन परिसरात ‘वदनी कवळ’ नावाचे शुद्ध शाकाहारी हॉटेल सुरु केले आहे.

यापूर्वी तिने हॉटेलच्या कामाचे फोटो शेअर केले होते आणि आता हॉटेलची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. काम पूर्ण झाल्यावर लवकरच हे हॉटेल प्रत्येकासाठी सुरू होणार आहे. सध्या अनघाच्या हॉटेलमध्ये इंटिरियरचे काम सुरू आहे. ‘वदनी कवळ’ हे शाकाहारी लोकांसाठी उत्तम भोजन आणि खवय्येगिरीसाठी उत्तम ठिकाण ठरणार आहे. इथे येणाऱ्या खवय्यांना अस्सल पारंपारिक थाळीचा आस्वाद घेता येईल, असे अनघाने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. अनघा आणि तिचा भाऊ अखिलेश यांनी एकत्र सुरु केलेल्या या नव्या व्यवसायासाठी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.