शुभंकर सांगणार मल्हारला स्वराची खरी ओळख; बाप- लेकीची भेट होणार..? प्रोमो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेला एक असे वळण आले आहे जे पाहून प्रेक्षकांची मालिकेतील रुची आणखीच वाढू लागली आहे. आधीच या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत होते आणि आता आलेल्या ट्विस्टमुळे टीआरपीच्या रेसमध्ये हि मालिका इतर मालिकांना मागे सारताना दिसते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते.. अखेर तो क्षण आता आला असून स्वरा मल्हारची मुलगी आहे हे समोर आलं आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक स्वराची खरी ओळख मल्हारसमोर कधी येणार..? याची वाट पाहत होते. अखेर रक्षाबंधनच्या दिवशी स्वराज मुलगी असल्याचे सत्य उघड झाले आणि त्यानंतर मोनिकाने बाप लेकीला त्यांची ओळख मिळू नये म्हणून नवा डाव रचला. तिने शुभंकरला स्वरा त्याची मुलगी असल्याचे सांगितले आणि त्यामुळे स्वराला मल्हारने स्वरा शुभंकर ठाकूर अशी नवी ओळख दिली. पण आता शुभंकरसमोर स्वरा मल्हारची मुलगी असल्याचे सत्य उघड झाले आहे. तसा प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर शेअर करण्यात आला आहे.

या प्रोमोमध्ये स्वरा शुभंकरला तिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावते की, ‘मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही कोणाला सांगणार नाही…’. शपथ घेतल्यानंतर स्वरा शुभंकरला सांगते की, ‘तुम्ही माझे बाबा नाहीयेत. मी मल्हार कामत आणि वैदहीची मुलगी आहे’. हे ऐकून शुभंकरच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो स्वराला म्हणतो की, ‘तू आधी का सांगितलं नाहीस..?’ तेव्हा स्वरा म्हणते की, ‘मला मोनिका काकूने धमकी दिली आहे. हे सत्य समोर आल्यानंतर शुभंकर मल्हारकडे जातो. पण तो स्वराची खरी ओळख मल्हारला सांगतो कि नाही? हे पुढील भागात समजेल. दरम्यान, आता मालिकेतील या नव्या ट्विस्टनंतर पुढे काय घडणार..? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.