‘गोष्टी निश्चित बदलतात पण..’; ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहिल्यानंतर सई ताम्हणकरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा आगळ्या वेगळ्या नावाचा आणि विषयाचा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. केवळ प्रेक्षक वर्ग नव्हे तर मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातील कलाकार मंडळी देखील या चित्रपटाच्या कथानकाचे कौतुक करत आहेत. असे असूनही प्रेक्षकांना हवा तास प्रतिसाद अजून काही मिळेना. अशातच अभिनेत्री सई ताम्हणकरने हा चित्रपट पाहिल्यानंतर तिची प्रतिक्रिया शेअर केली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट पाहिल्यानंतर तिला हा चित्रपट कसा वाटला..? याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने आवर्जून हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. सईने म्हटलंय, ‘तुम्ही शेवटचा असा कोणता चित्रपट पाहिला आहे, ज्याचा तुमच्यावर परिणाम झाला..? तुमच्यात काहीतरी बदल झाले..? म्हणजे तुम्ही प्रवास करता, त्यावेळी काही गोष्टी निश्चित बदलतात, पण काय बदलत हे तुम्हाला सांगता येत नाही. मी आता असं काही तरी पाहिलं जे माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. क्षणाचाही विलंब न करता हा चित्रपट पाहा भावांनो!!!’

गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना दिसत आहे. या दर्जेदार चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार मंडळी हा चित्रपट प्रेक्षकांनी पहावा म्हणून आवाहन करत आहेत.