‘तुझ्यासारखे मित्र आहेत म्हणून मी आहे..’; जिगरी दोस्तासाठी मानेंची भावनिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात सातारचा बच्चन अशी वेगळीच ओळख असणारे अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. कधी अनुभव, तर कधी जवळच्या माणसांबद्दल ते भरभरून लिहितात. आताही त्यांनी अशीच एका खास माणसासाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमधून त्यांनी आपल्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याच्यासोबतच खास फोटो शेअर करत काही खास आठवणी सांगितल्या आहेत.

किरण माने यांनी लिहिलंय, ‘मायणीत देशमुख गल्लीत चंद्राआज्जी होती. हरीभाऊ देशमुखांची आई. गावात कुणालाही विंचू चावला की पहिलं त्याला पळवत चंद्राआज्जीकडं आणायचे. विंचू चावलेला माणूस भडक्यानं अक्षरश: बोंबलत असायचा…आज्जीकडं एक झाडपाल्याचं ‘औषध’ असायचं! दहा मिन्टात माणूस खडखडीत बरा होऊन, हसत-हसत घरी जायचा! चंद्राआज्जीची माझ्यावर लै माया! माने सायबाचं लेकरु म्हणत जवळ घ्यायची. मी तिला एकदा या झाडपाल्याचं शिक्रेट विचारलं. कुनाला सांगू नको म्हनत तिनं सांगायला सुरूवात केली. माजं नुक्तंच लगीन झाल्यालं. कारभार्‍याला जेवन घिवून रानात चाल्लेवते. मोट्टा पाऊस आला. येका झाडाखाली आडोशाला थांबले. फांदीवर कायतर हाल्ल्यागत दिसलं. बगीतलं तर इच्चू आन् सरड्याची भांडनं चाल्लीवती. इच्चू लै खवाळल्याला. सरड्याला नांगी मारायचा. सरडा सार सार सार फांदीवर जायचा, त्या झाडाचा पाला खायचा आन् परत यिवून इचवाला डिवचायचा. परत इच्चू नांगी मारायचा. परत सरडा झाडावरचा पाला खाऊन तरतरीत हून परत इचवाफुडं जाऊन उभा र्‍हायाचा. हा खेळ बघून आज्जीला त्या झाडपाल्यातल्या औषधी गुणांचा शोध लागला होता!’

‘परवा एका युट्यूबरनं मुलाखतीत मला प्रश्न विचारला : किरणसर, अभिनयक्षेत्रात स्ट्रगल करताना तुमच्यावर अनेक खचवणारे, अपमानीत करणारे जिवघेणे प्रसंग आले. तरीही आम्हाला तुम्ही हसतमुखाने आणि भक्कमपणे उभे असलेले दिसता. यश, मानसन्मान मिळवलं. तुम्हाला लोकप्रियताही मिळाली. हे कसं जमलं? मी मिनिटभर शांत झालो. थोडा विचार केला. मलाच कळेना हे कसं शक्य होतं असेल? मुळात हा संघर्ष मला इतका अंगवळणी पडलाय की… पण अचानक मला चंद्राआज्जीचा तो किस्सा आठवला. मग मला जाणवलं की अशावेळी माझ्या पाठीशी एक भक्कम ताकद उभी रहाते, ती म्हणजे माझी जिवातली माणसं! माझ्यावर माझ्यापेक्षा जास्तच विश्वास आहे त्यांचा. या मित्रांमध्ये सगळ्यात आधी नांव येतं ते माझा जिवलग मित्र सुनिल कारखानीस याचं!’

‘सुनिलनं माझ्यासाठी काय केलंय, हे सांगायची ही वेळ नाही. एका स्पेशल दिवशी मी ते सविस्तर सांगेन. आत्ता आज मी फक्त एवढेच म्हणेन की, मुंबईसारख्या महानगरीत अभिनयक्षेत्रात संघर्ष करत असताना, परिस्थितीचा विंचू मला वारंवार नांगी मारत असताना, सुनिल हा माझ्या मेंदूतला- मनातला भडका शांत करणारा, मला बळ देणारा, मला हसतमुख ठेवणारा, माझा झाडपाला, माझं औषध आहे ! माझा मित्र सुनिल कारखानीस! सुन्या, तुझ्यासारखे मित्र आहेत म्हणून मी आहे ! विंचू थकेल, त्याच्यातलं विष संपेल पण मी थकणार-संपणार नाही, पुन:पुन्हा ताठ मानेनं उभा राहिन. वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा, सुन्या!’