‘राधा- कृष्ण’ची वेडी प्रीत पुन्हा जगाला समजावणार शाश्वत प्रेमाचा अर्थ; नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय संस्कृतीत राधा आणि कृष्णाचं नातं विलक्षण आहे. राधा-कृष्णाच्या या नात्यावर आधारित अनेक चित्रपट, गाणीही तयार झाली आहेत. मात्र जगाला पुुन्हा एकदा प्रेमाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी सप्तसूर म्युझिकनं ‘राधा कृष्ण’ या नव्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली असून अभिनेत्री सुखदा खांडकेकर या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. मंदार आपटे आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सावनी रवींद्र यांनी हे गाणं गायलं आहे.

साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकची निर्मिती असलेल्या या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन मयुरेश वाडकर यांनी केलं आहे. सविता करंजकर जमाले यांच्या गाण्याला महेश खानोलकर यांनी स्वरसाज चढवला आहे. ज्येष्ठ संगीत संयोजक अप्पा वढावकर यांनी संगीत संयोजन केलं आहे. अभिनेत्री सुखदा खांडकेकरसह जितेश निकम या म्युझिक व्हिडिओमध्ये चमकला आहे. धनश्री मेहता गोएल यांनी नृत्य दिग्दर्शनाची, तर आकाश बिंदू यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. अमृता संत आणि मनवा नाईक म्युझिक व्हिडिओच्या मार्गदर्शक आहेत.

‘तुझ्या प्रीतीचे वेड ना साधे, अवघे जीवन वाहिले… कृष्ण कृष्ण म्हणत न कळले मीच कृष्ण जाहले राधा कृष्ण कृष्ण कृष्ण’ असे शब्द असलेलं राधा-कृष्ण हे गाणं सप्तसुर म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर लाँच करण्यात आलं आहे. राधा-कृष्णाच्या नात्याचं पुन्हा एकदा दर्शन घडवण्याचा प्रयत्न या गाण्यात करण्यात आला आहे. व्हिडिओ ३.५ मिनिटांचा असून संपूर्ण गाणे आडियो प्लॅटफॉर्मवर ६ मिनिटांचे आहे. आतापर्यंत सप्तसूर म्युझिकच्या विविध म्युझिक व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादाप्रमाणेच राधा-कृष्ण हा म्युझिक व्हिडिओही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल यात शंका नाही.