‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित पार पडला सोहळा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या राहुल चोपडा यांनी ‘गडकरी’ शैलीने उपस्थित राहून प्रेक्षकांची मने जिंकली.

या चित्रपटाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे की, नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिजीत मजुमदार, दिग्दर्शक अनुराग भुसारी, अक्षय देशमुख आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नितीनजींचे आयुष्य आपल्या समोर आणले आहे. त्यामुळे त्यांच्या टीमला आणि कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो. एक सुंदर चित्रपट तुम्ही तयार केला. याचा ट्रेलर बघून आमच्या सगळ्यांच्याच मनात हा चित्रपट पाहाण्याची उत्कंठा आहे. नितीनजींच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे हे तीन तासांमध्ये बांधणे कठीण आहे. नितीन गडकरी एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचे आयुष्य एका भागात दाखवणे शक्य नाही त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की याचा दुसरा भागही लवकरच प्रदर्शित व्हावा’.

भारतीय क्रिकेटर उमेश यादव म्हणाले, ‘नितीन गडकरी यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. नागपूरमध्ये ज्यावेळी हायवे झाले, त्यावेळी क्रिकेटर एम एस धोनीनेही त्यांच्या या कल्पनेचे स्वागत केले. भारताला विकासाच्या दिशने नेण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट व्हावा, ही खूप आनंदाची बाब आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट पाहावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला पाहिजे. जेणे करून तरुणाईला एक आदर्श समाजसेवक, नेता काय असतो, याची ओळख होईल’.