जेवायला या!! कुरकुरीत फिश फ्राय, टम्म फुगलेली भाकरी; किशोरी शहाणेंनी बनवलं चुलीवर जेवण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी गेली अनेक दशकं सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मराठी, हिंदी मालिका तसेच चित्रपटांमधून त्यांनी कायम वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आजही त्या मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. शिवाय त्या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि त्यामुळे त्यांचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. अलीकडेच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या चक्क चुलीवर जेवण बनवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे. या व्हिडिओत किशोरी चुलीवर जेवण बनवताना दिसत आहेत. अनेकदा किशोरी त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांच्या फार्महाऊसवर विकेंड एन्जॉय करण्यासाठी जात असतात. याहीवेळी त्या त्यांच्या कुटुंबियांसोबत फार्महाऊसवर सुट्टी घालवताना दिसत आहेत. दरम्यान त्यांनी मस्त चुलीवरील जेवणाचा बेत आखला होता आणि मेन्यू असा कि कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल.

या व्हिडीओत किशोरी चुलीवर ठेवलेल्या तव्यावर मच्छी फ्राय करताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर मस्त मच्छी फ्राय करून झाल्यावर त्याच तापलेल्या तव्यावर त्यांनी थापलेली नाचणीची भाकरी टाकली, छान पाणी लावून घेतलं आणि दोन्ही बाजूने भाजून घेतली. भाकरी मस्त टम्म फुगल्यावर त्यांनी आपल्या हाताने छान असे दाखवत त्यांच्या चाहत्यांना खायला या, असे म्हटले आहे. ‘चला जरा चुलीवरचं जेवण जेवूया, मासे आणि नाचणीची भाकरी’, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ शेअर करून तीन दिवस झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अजूनही तुफान व्हायरल होताना दिसतो आहे.